अथांग दिसणारा समुद्र अनेकदा ताणतणाव दूर लोटण्यासाठी मदत करतो. फेसळणाऱ्या आणि किनाऱ्याला धडकणाऱ्या समुद्राच्या लाटा पाहिल्या, की त्यांची आपापसात, सुरू असणारी शर्यत लक्ष वेधून घेते. नरज याच लाटांवर खिळते आणि कधी या लाटांची शर्यत पाहण्यात आपण गुंततो हे लक्षातसुद्धा येत नाही. हा तोच समुद्र आहे जो भरतीच्या वेळी जितका खवळलेला दिसतो, तितकाच तो ओहोटीच्या वेळी निपचित… अगदीच शांत आणि संथ दिसतो. जणू काही एका वादळानंतरचीच शांतता. समुद्र प्रत्येकाला त्याची वेगळी रुपं दाखवतो.
असा हाच समुद्र 2026 च्या जुलै महिन्यात एका मोठ्या भरतीनं मुंबई शहराची चिंचा वाढवणार आहे. यंदा मान्सूनदरम्यान जून ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये शहरात मुसळधार पावसाचा तडाखा बसणार असून, यादरम्यान समुद्राला 24 दिवस मोठी भरती असेल असा अंदाज आहे. 16 जुलै हा दिवस अधिक दक्षतेचा असू शकतो. कारण या दिवशी तब्बल 4.89 मीटर उंचीपर्यंतच्या लाटा किनाऱ्याला धडकणार असल्यानं या भरतीदरम्यान मुंबई जलमय होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. पण, ही भरती खरंच इतकी रौद्र असते? हे भरती आणि ओहोटीचं नेमकं चक्र तरी काय?
भौगोलिक स्थान आणि सूर्य- चंद्राशी नातं
समुद्र, महासागरातील भरती आणि ओहोटीचा थेट संबंध चंद्र आणि सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाशी असतो. पृथ्वी सूर्याभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे लंबवर्तुळाकार आकारात फिरते आणि चंद्र पश्चिमेकडूनन पूर्वेकडे याच आकारात पृथ्वीभोवती फिरतो. परिणामी चंद्राचा आकार महिन्याच्या प्रत्येक दिवशी वेगळा असो. पृथ्वीच्या ज्या भागासमोर चंद्र असतो तिथं गुरुत्त्वाकर्षण अधिक असतं तर, विरुद्ध दिशेला कमी. ज्यामुळं चंद्राच्या दिशेला पृथ्वीची जी बाजू असते तिथं पृष्ठावरील पाणी आकर्षिक होऊन खेचलं जातं आणि भरती येते. तर, त्याचवेळी विरुद्ध दिशेला मात्र ओहोटी असते. थोडक्यात 24 तासांच्या काळात पृथ्वीवर दोनदा भरती आणि दोनदा ओहोटी येते.
इथंही गणित आहे, पृथ्वी 24 तासांमध्ये स्वत:भोवतीची एक प्रदक्षिणा पूर्ण करत असून, प्रत्यक्षात 12 तासांनी भरती आणि ओहोटी येणं अपेक्षित आहे. मात्र, भरती ही दर दिवशी 26 मिनिटं उशिरानं येते. यास कारण म्हणजे पृथ्वीचं पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरणं आणि चंद्राचं तिच्या अक्षाभोवती फिरणं.
भरती आणि ओहोटीचे प्रकार
भरती आणि ओहोटीचेही काही प्रकार असून, यामध्ये वसंत ऋतूतील भरती-ओहोटी, नीप भरती-ओहोटी, उष्ण कटिबंधीय आणि विषुववृत्त भरती, अपोगीन आणि पेरिगीन भरती-ओहोटी, विषुववृत्तीय स्प्रिंग भरती-ओहोटी. वरील प्रत्येक प्रकारात भरती आणि ओहोटीच्या गणितात चंद्र आणि सूर्याची स्थिती महत्त्वाची भूमिका बजावते.
समुद्रात लाटा कशा तयार होतात?
भरती ओहोटीच्या प्रक्रियेमध्ये समुद्रात उसळणाऱ्या लाटाही तितक्याच महत्त्वाच्या. या त्याच लाटा, ज्या जुलै महिन्यात रौद्र रुप धारण करून मुंबईपुढं संकट होऊन उभ्या ठाकणार आहेत. मुळात समुद्रात तयार होणाऱ्या लाटा उसळण्यामागे वारा हेसुद्धा मुख्य कारण असतं. वाऱ्याचा वेग आणि उर्जा जितकी जास्त, तितकी लाटांची उर्जाही जास्त. समुद्राच्या किती मोठ्या क्षेत्रावरून हा वारा प्रवाहित होत आहे त्याला ‘फेच’ म्हणत असून, लाटांसाठी हा फेचही तितकाच महत्त्वाचा. वारा विनाअडथळा वाहत आल्यास लाटाही तितक्याच तीव्रतेनं उसळतात. वाऱ्याचा कालावधीसुद्धा लाटांची ताकद ठरवतो. वारा विनाअडथळा तासन् तास वाहत राहिल्यास प्रचंड मोठ्या, डोंगराइतक्याही लाटा येतात.
समुद्राची लाट जेव्हा खोल समुद्रातून किनाऱ्याच्या दिशेनं येते तेव्हा तळ उथळ होतो आणि लाटेचा खालचा भाग कमकुवत होऊन वरील लाट अक्षरश: किनाऱ्यावर कोसळते. चक्रीवादळादरम्यान याचा प्रत्यय पाहायला मिळतो. जाणकारांच्या माहितीनुसार चक्रीवादळसदृश्य परिस्थितीत सागरी क्षेत्रावर कमी दाबाचा पट्टा तयार होऊन समुद्राची पातळी वर उचलली जाते आणि अजस्त्र लाटा किनारपट्टीवर धडकतात. अनेकदा एकाहून अधिक लाटा एकत्र येऊन त्यांची उर्जा एकवटते आणि किनाऱ्यावर धडकणारी लाट ही प्रचंड ताकदीची अन् नुकसान करणारी असते. या लाटेला ‘रॉग व्हेव’ म्हणतात.
