मुंबई-पुणे प्रवास आणखी वेगवान करणाऱ्या कनेक्टिंग लिंकचं उद्धाटन झालं आहे. महाराष्ट्र सरकारचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प असणारा कनेक्टिंग लिक हा एक अभियांत्रिकी चमत्कार असल्याचं म्हटलं आहे. कनेक्टिंग लिंकची गिनीज बूकमध्येही नोंद झाली आहे. यानंतर सोशल मीडियावर #inframandevabhau हा हॅशटॅग प्रचंड चर्चेत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यभरात पायाभूत सुविधांचं जाळं उभं केलं असल्यानेच त्यांना इंफ्रा मॅन म्हटलं जात असून, हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेत मोठी उलाढाला पाहायला मिळत आहे. या महामार्गामुळे मुंबई-नागपूर अंतर कमी झालं असून, व्यापार आणि दळणवळणाला गती मिळाली आहे. मुंबईसह पुणे, नागपूर, नवी मुंबईत मेट्रोचं जाळं विस्तारण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला आहे. देशातील सर्वात लांब सागरी पूल अटल सेतुमुळे मुंबई-नवी मुंबईतील अंतर मिनिटांवर आलं आहे. याशिवाय जलयुक्त शिवार आणि मराठवाडा वॉटर ग्रील यासारख्या योजनांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामीण महाराष्ट्राचा कायापालट केला आहे. त्यामुळेच सोशल मीडियावर हॅशटॅग inframandevabhau ट्रेंड होत आहे.
कनेक्टिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद
यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबई आणि पुणे यांच्यादरम्यानचे अंतर कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण कनेक्टिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. या बोगद्याला जगातील सर्वात रुंदीच्या बोगद्याचा मान मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने उभारणी केलेला हा बोगदा तब्बल 23.5 मीटर रुंदीचा आहे.
महत्त्वाकांक्षी प्रकल्पाविषयी
6695 कोटी प्रकल्पाचा खर्च
13.3 किमी मार्गाची लांबी
मुंबई-पुणे अंतर 6 किमीने होणार कमी
प्रवासाच्या वेळेत सुमारे 25 मिनिटे होणार बचत
मुंबई ते पुण्यादरम्यान यशवंतराव चव्हाण महामार्गावर सध्या खंडाळा घाटात अनेकदा वाहतूककोंडी होते. त्यावर पर्याय म्हणून खोपोली एक्झिटपासून ते लोणावळ्याच्या कुसगावपर्यंत (सिंहगड कॉलेज) 13.3 किमी लांबीचा मार्ग उभारला असून, त्यात दोन बोगदे आहेत. त्यातील सर्वात मोठ्या बोगद्याची लांबी 8.87 किलोमीटर असून, दुसरा बोगदा 1.68 किमी लांबीचा आहे. या प्रत्येक दिशेच्या बोगद्यात वाहतुकीसाठी चार मार्गिका, तसेच एक सर्व्हिस लेन अशा पाच मार्गिका उभारण्यात आल्या आहेत.
एवढ्या रुंदीचा बोगदा तयार करताना माती ढासळण्याची भीती असते. त्यामुळे सहसा १८ मीटरपेक्षा अधिक रुंदीचे बोगदे खणले जात नाहीत. मात्र, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतूक पाहता 23.5 मीटर रुंदीचा बोगदा तयार केला आहे तसेच बोगद्यातील अंतर्गत सुरक्षेची कामे केल्यानंतर त्याची रुंदी साधारणपणे 22.33 मीटर एवढी आहे.
