आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन बाजारात अस्थिरता वाढताना दिसत आहे. भारतात घरगुती गॅसचा पुरवठा सध्या सुरळीत असला तरी उद्योग आणि व्यवसायासाठी लागणाऱ्या व्यावसायिक गॅसचा तुटवडा अनेक भागांत जाणवू लागला आहे. त्यामुळे काही ठिकाणी हॉटेल, लहान उद्योग आणि व्यावसायिकांनी पर्यायी मार्ग शोधण्यास सुरुवात केली आहे.
याच पार्श्वभूमीवर उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात एक वेगळा प्रयोग समोर आला आहे. संजीवनी उद्योग समूह आणि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने व्यावसायिक गॅसला पर्याय शोधण्याचा प्रयत्न करत इथेनॉलवर चालणाऱ्या स्टोव्हचे संशोधन केले आहे. पुण्यातील तांत्रिक संस्थेच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेला हा प्रयोग सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
कोपरगावात सुरू झाला पर्यायी इंधनाचा प्रयोग
कोपरगाव तालुक्यातील शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना आणि संजीवनी उद्योग समूह यांनी संयुक्तपणे या प्रयोगाची सुरुवात केली आहे. इंधनाच्या वाढत्या खर्चामुळे उद्योग क्षेत्रावर मोठा आर्थिक ताण येत असताना स्वस्त आणि स्थानिक स्तरावर उपलब्ध होणाऱ्या पर्यायांचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर इथेनॉलवर चालणारा स्टोव्ह तयार करण्याचा प्रयोग करण्यात आला आहे. हा स्टोव्ह विशेषतः हॉटेल, कॅन्टीन आणि व्यावसायिक वापरासाठी उपयुक्त ठरू शकतो, असा दावा या प्रयोगामागील संशोधकांनी केला आहे.
साखर कारखान्याचा आधीच सीएनजी प्रकल्प
कोपरगावातील शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने यापूर्वीही पर्यायी ऊर्जेच्या क्षेत्रात पाऊल टाकले आहे. कारखान्याने सीएनजी प्लांट उभारून सीएनजी गॅसचे उत्पादन सुरू केले आहे.
यामुळे साखर उद्योगाशी संबंधित उपउत्पादनांचा उपयोग करून ऊर्जा निर्मिती करण्याचा प्रयत्न झाला. आता त्याच धर्तीवर इथेनॉलवर आधारित स्टोव्ह तयार करण्याचा प्रयोग करण्यात आला आहे. यामागील उद्दिष्ट म्हणजे उद्योगांसाठी स्वस्त आणि सहज उपलब्ध इंधन पर्याय तयार करणे.
व्यावसायिक गॅसपेक्षा कमी खर्चाचा पर्याय
या स्टोव्हचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे त्याचा कमी खर्च. व्यावसायिक एलपीजी गॅसच्या तुलनेत इथेनॉलवर चालणाऱ्या स्टोव्हचा खर्च कमी येऊ शकतो, असा दावा करण्यात येत आहे.
भारतामध्ये सध्या इथेनॉल निर्मिती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे या उपलब्धतेचा उपयोग स्वयंपाकासाठी किंवा व्यावसायिक वापरासाठी केला तर इंधन खर्चात बचत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
‘इथेनॉलचा मोठा साठा उपलब्ध’ – ‘विवेक कोल्हे’
या प्रयोगाबाबत बोलताना संजीवनी उद्योग समूहाचे चेअरमन ‘विवेक कोल्हे’ म्हणाले,
“आज पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स करायला परवानगी मिळाली आहे.. मात्र त्यानंतरही जवळपास 1000 कोटी लिटर अतिरिक्त इथेनॉल आजही उपलब्ध आहे.. सरकारने जर इथेनॉल गॅस किंवा इथेनॉल स्टोव्ह सारख्या संशोधनाला परवानगी दिली तर मोठा फायदा सहकारी सेक्टरला होईल यात शंका नाही.”
सरकारच्या धोरणात्मक निर्णयाची प्रतीक्षा
या प्रकल्पामागील टीमने दोन वर्षांपूर्वी पुण्यातील एका कंपनीसोबत करार करून संशोधन पूर्ण केले आहे. मात्र इथेनॉलवर चालणाऱ्या स्टोव्हसाठी अजून स्पष्ट धोरण नसल्यामुळे हा प्रकल्प सध्या थांबवण्यात आला आहे.
याबाबत ‘विवेक कोल्हे’ म्हणाले, “जर इथेनॉल गॅस किंवा इथेनॉल स्टोव्हला सरकारने परवानगी दिली तर ट्रान्सपोर्ट वर होणारा मोठा खर्च वाचेल.. ट्रान्सपोर्ट सह त्यावर होणारा इंधन खर्च देखील वाचेल.. केनिया सारख्या देशात जवळपास 15 लाख घरांमध्ये या स्टोव्हचा वापर होत आहे.. दोन वर्षांपूर्वीच पुण्याच्या कंपनी बरोबर टायप करून आम्ही हे संशोधन केलं मात्र धोरणात्मक निर्णय नसल्याने आम्ही हे स्थगित ठेवलेल आहे.”
