महागड्या घड्याळासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित झाल्यानंतर आता मुंबईच्या महापौर रितू तावडे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. यावेळी निमित्त ठरत आहे ते म्हणजे त्यांच्या वाहनावर असणारा लाल- निळा दिवा. तावडे यांच्या नव्या कोऱ्या कारवर लावण्यात आलेल्या लाल-निळ्या फ्लॅश दिव्यांमुळे सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.
या प्रकरणावरून नियमांचे उल्लंघन होत असल्याची टीका त्यांच्यावर केली जात आहे. सोशल मीडियावरील ‘मुंबईचा शिवसैनिक’ या एक्स पेजवरून एक पोस्ट शेअर करत या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. केंद्र सरकारने मे 2017 मध्ये सामान्य सरकारी वाहनांवर लाल दिवा वापरण्यास बंदी घातली होती. व्हीआयपी संस्कृती कमी करण्याच्या उद्देशाने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर बहुतांश सरकारी वाहनांवर लाल दिव्यांचा वापर थांबवण्यात आला. मात्र, आता महापौरांच्या नव्या गाडीवर समोर लाल-निळे फ्लॅश दिवे बसवण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. दिवसा देखील पोलिसांच्या वाहनांप्रमाणे हे दिवे लावले जात असल्याचे काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान या घटनेनंतर दोन दोन दिवसांपूर्वीच हे दिवे काढून टाकल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
दरम्यान वादाचा हा मुद्दा चर्चेत येताच खुद्द महापौर तावडे यांनी झी 24ताशसी संवाद साधताना या प्रकरणी प्रतिक्रिया देत काही गोष्टी स्पष्ट केल्या. प्रशासनाने महापौरांना वाहन देताना त्यावर नियम आहेत, कशा पद्धतीनं वाहन दिलं पाहिजे, या सर्व गोष्टी तपासून महापौरांना दिल्या पाहिजेत. त्यामुळं कारच्या खाली, वर फ्लिकर असणं हा सर्व विषय प्रशासनानं तपासला पाहिजे आणि त्याबाबत तुम्ही माहितीपत्रक जारी करा असं आपण त्यांना सूचित केल्याचं तावडेंनी स्पष्ट केलं.
वाहनावर असणाऱ्या दिव्यांमध्ये चूक कोणाची हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, असा सूर त्यांनी आळवला. ‘मागेही माझ्या घड्याळावरून बोललं गेलं, आता गाडीबाबत बोललं जातंय. पण, मला यात कशातच रस नाही’, असं सांगत माध्यमं आणि व्हिडीओ पाहिल्यानंतर दिव्यांची बाब लक्षात आली असं म्हणत मुंबई महानगरीमध्ये महिन्याभरापासून जी कामं सुरू आहेत, तिथं मुंबईच्या लोकांनी महापौरांना रस्त्यावर उभं राहिलेलं पाहिलं आहे. मात्र विरोधकांना काही दुसरे विषयच नसल्याचा टोला लगावत ज्यांनी ही चूक केली, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिले असंच त्या ठामपणे म्हणत प्रशासनावर ताशेरे ओढत त्यांनी या वादापासून फारकत केली.
