गॅस तुटवड्याच्या अफवा, शिर्डी-शनिशिंगणापूरमध्ये पुरवठा सुरळीत ठेवण्याचे आव्हान; अवैध रिफिलिंगवर वॉच

जिल्ह्यात गॅस तुटवडा निर्माण होईल या भीतीने नागरिकांकडून गॅस सिलेंडर घेण्यासाठी एजन्सीसमोर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. मात्र जिल्ह्यात घरगुती गॅसचा कोणत्याही प्रकारचा तुटवडा नसल्याचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी स्पष्ट केले आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करत प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे.

जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध

गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर गॅस तुटवड्याबाबत विविध अफवा पसरत असल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. त्यातून अनेक ठिकाणी नागरिक मोठ्या प्रमाणात सिलेंडर घेण्यासाठी एजन्सीसमोर रांगा लावत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी स्पष्ट केले की, जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा नियमितपणे सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक घाई किंवा साठेबाजी करू नये. दरम्यान, गॅस सिलेंडरचा गैरवापर होऊ नये आणि अवैध रिफिलिंगचे प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत.

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात विशेष पथके तैनात करण्यात आली असून अवैध रिफिलिंग सेंटरवर लक्ष ठेवले जात आहे. कुठेही बेकायदेशीर रिफिलिंग आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

धार्मिक स्थळांवरही प्रशासनाचे विशेष लक्ष

याशिवाय जिल्ह्यातील प्रमुख धार्मिक स्थळांवरही प्रशासनाचे विशेष लक्ष आहे. शिर्डी आणि शनी शिंगणापूर येथे दररोज मोठ्या प्रमाणात भाविक येत असल्याने येथील प्रसादालयांमध्ये गॅस पुरवठा सुरळीत राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणच्या प्रसादालयांमधील गॅस साठ्याची पाहणी संबंधित अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. भाविकांची संख्या मोठी असल्यामुळे प्रसाद वितरणात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी पुरेसा गॅस साठा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. सध्या दोन्ही ठिकाणी प्रसादालये नियमित सुरू असून गॅस तुटवड्याचा प्रश्न उद्भवणार नसल्याचेही जिल्हाधिकारी आशिया यांनी स्पष्ट केले.

तसेच एकदा गॅस सिलेंडर घेतल्यानंतर पुढील बुकिंगसाठी 21 दिवसांचा कालावधी राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक साठा करण्याऐवजी नियमित पद्धतीने गॅस बुकिंग करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, अफवांमुळे निर्माण झालेल्या घबराटीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जिल्हाभरात सतर्कता वाढवली असून गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *