ठाणे महापालिकेच्या आवारात नगरसेवकाची आंघोळ, पाणीटंचाई विरोधात आंदोलन

गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरात पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. पाणी वितरण करणारी यंत्रणा सदोष असल्याने पाण्याचा पुरवठाच होत नाही. त्यामुळे आपल्या घरातही पाणी आले नाही, असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक अभिजीत पवार यांनी थेट ठाणे महापालिका मुख्यालयाच्या आवारातच आंघोळ केली. ठाणे महानगरपालिका हद्दीत पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. ठाणे शहराला 621 दशलक्ष लिटर्स पाण्याची गरज आहे. मात्र, प्रत्यक्षात 550 दशलक्ष लीटरच्या आसपास पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे मोठ्याप्रमाणात पाणी टंचाई भेडसावत आहे.

गेल्या काही दिवसांपासून दर आठवड्यात निर्जळी घेण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून कळव्यात प्रचंड पाणी टंचाई भेडसावत आहे. बुधवारी अनेक सोसायट्यांमध्ये पाणीच आलेले नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. या संतप्त नागरिकांच्या भावनांना अभिजीत पवार यांनी अनोखे आंदोलन करून वाट मोकळी करून दिली.

अभिजीत पवार हे साधारण दीड वाजेच्या सुमारास ठाणे पालिका मुख्यालयात आले. पालिका मुख्यालयाच्या आवारात असलेल्या नळावर बादली पाण्याने भरून त्यांनी पोर्चमध्येच आंघोळ केली. अभिजीत पवार यांनी आपल्या या अनोख्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. “पाणी वितरण करणारी यंत्रणा सदोष आहे. पाणी सोडण्यासाठी जी माणसे तैनात केली आहेत. ते पक्षपात करतात. अधिकाऱ्यांना फोन केल्यास ते उद्या बघू, असे सांगतात. आज आपल्या घरात पाणीच नसल्याने नाईलाजाने इथे येऊन आंघोळ करावी लागली. त्यामुळे जर पाणी संकट दूर केले नाही तर यापुढे अधिकाऱ्यांच्या घरात जाऊन आंघोळ करू”, असा इशारा त्यांनी दिला.

 

‘…तर तो काळा दिनच’, मनोज प्रधान यांची टीका

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनीही ठामपाच्या कारभारावर टीका केली. ठाणे पालिकेनंतर स्थापन झालेल्या नवी मुंबई महानगर पालिकेने आपले धरण विकसित केले आहे. मात्र ठाणे पालिकेला ते शक्य झालेले नाही. आमदार जितेंद्र आव्हाड आणि आपण पद्मसिंह पाटील हे जलसंपदा मंत्री असताना धरण मंजूर करून आणले होते. मात्र, ते धरणही सत्ताधाऱ्यांना बांधता आले नाही. आज एका नगरसेवकाच्या घरात पाणी नसल्याने त्याला पालिका मुख्यालयात यावे लागत असेल तर तो दिवस ठाणे महापालिकेसाठी काळा दिवस आहे, अशी मनोज प्रधान यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *