मेन्यूमधून डोसा-उत्तप्पा, दालमखनी गायब! गॅसटंचाईचा हॉटेलमधील ताटालाही चटका, शेगड्या-इंडक्शनचा जुगाड

आखाती देशांमधील संघर्षाचा चटका हॉटेलमधील नाश्ता-जेवणाच्या ताटाला बसला असून, व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या टंचाईमुळे रेस्तराँ-हॉटेलचालकांनी आपल्या मेन्यूमधून खमंग डोसा-उत्तपा, वड्यांसारखे तळणीचे पदार्थ अन् मंद आचेवर शिजवावे लागणारे दाल मखनी, दम बिर्याणीसह चायनीज खाद्यपदार्थ कमी केले आहेत. त्याऐवजी पोहे, उपमा, सँडविचसारखा नाश्ता, मिसळ – पावभाजी, भेळ-शेवपुरीसारखे ‘चाट’ पदार्थ, झटपट होणाऱ्या भाज्यांचा समावेश असलेल्या थाळ्या खवय्यांना ‘सर्व्ह’ केल्या जात आहेत.

गॅसटंचाईची परिस्थिती निर्माण झाल्याने, शहरातील हॉटेलांनी आपला ‘मेन्यू’ बदलला आहे. सतत गॅस पेटता ठेवावा लागेल, अशा खाद्यपदार्थांना ‘मेन्यू’मधून कात्री लावण्यात आली आहे. गरम तव्यावर होणारे जाळीदार डोसा-उत्तपा, वडे, भजी, सामोश्यासारखे तळणीचे चमचमीत पदार्थ, मंद आचेवर शिजवली जाणारी दाल मखनी, ‘दम’ प्रक्रियेतून तयार केली जाणारी बिर्याणी, उकळाव्या लागणाऱ्या ग्रेवी-सूप असे गॅसचा जास्त वापर करणारे पदार्थ बंद करण्याचा निर्णय रेस्टॉरंटचालकांनी घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *