पुण्यात कॉलेज हॉस्टेलसमोरच तरुणीवर हल्ला; हल्लेखोर गावातीलच निघाला, विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण

जुन्नर शहर बुधवारी सकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने अक्षरशः हादरून गेले. सकाळी साधारण ११ वाजण्याच्या सुमारास आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहासमोर एक तरुण अचानक आला आणि काही कळायच्या आत त्याने महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर धारदार हत्याराने सपासप वार केले. दिवसाढवळ्या घडलेल्या या थरारक प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं.

मिळालेल्या माहितीनुसार, २० वर्षीय एक विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे वसतिगृहाच्या परिसरात उभी होती. त्याच वेळी महेश मुरलीधर डामसे नावाचा तरुण तेथे आला. सुरुवातीला काय घडतंय हे कुणालाच समजलं नाही. मात्र काही क्षणांतच त्याने हातातील धारदार हत्यार काढलं आणि तरुणीवर वार करण्यास सुरुवात केली. आरोपीने तिच्या चेहऱ्यावर आणि मानेवर सपासप वार केल्याची माहिती समोर येत आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे वसतिगृहातील विद्यार्थिनी आणि नागरिक घाबरून गेले.

आरडाओरड ऐकून परिसरातील नागरिक आणि विद्यार्थिनी धावत बाहेर आल्या. मात्र तोपर्यंत आरोपी घटनास्थळावरून पसार झाला होता. जखमी अवस्थेत पडलेल्या विद्यार्थिनीला स्थानिकांनी तातडीने उचलून जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सध्या तिच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, जखमी विद्यार्थिनी आणि हल्ला करणारा तरुण हे दोघेही एकाच गावचे असल्याचे समोर आले आहे. आरोपी काही दिवसांपासून त्या तरुणीला त्रास देत होता, अशीही माहिती स्थानिकांकडून सांगितली जात आहे. त्यातूनच हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच जुन्नर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसराची पाहणी करून पंचनामा केला असून फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. या घटनेमुळे जुन्नरमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपीला तातडीने अटक करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *