‘दुसऱ्या लग्नाला माझी हरकत नाही’, बाँड पेपरवर लिहून घेण्यासाठी विवाहितेचा छळ, मुलाच्या हव्यासाला कंटाळून सुनेने जीव दिला

एकीकडे आपण स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा मारत असताना, दुसरीकडे आजही समाजात मुलगाच हवा या हट्टापायी महिलांचा छळ होत असल्याचे विदारक वास्तव समोर आलं आहे. बीड तालुक्यातील म्हाळसापूर येथे तीन मुली झाल्याच्या कारणावरून सासरच्या जाचाला कंटाळून एका 28 वर्षीय विवाहितेनं आपलं जीवन संपवलं आहे. भक्ती अमोल कोरडे असं या महिलेचं नाव असून, या प्रकरणी तिच्या पतीसह सासू आणि सासऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

भक्ती कोरडे यांचा विवाह काही वर्षांपूर्वी म्हाळसापूर येथील अमोल कोरडे यांच्याशी झाला होता. संसाराच्या सुरुवातीच्या काळानंतर त्यांना तीन मुली झाल्या. मात्र, वंशाला दिवा हवा म्हणजेच मुलगाच हवा, या हट्टापायी सासरच्या मंडळींनी भक्ती यांचा छळ सुरू केला. गेल्या अडीच वर्षांपासून हा मानसिक आणि शारीरिक छळ पराकोटीला पोहोचला होता. मिळालेल्या माहितीनुसार, पतीला दुसरे लग्न करण्यासाठी भक्तीने संमती द्यावी, यासाठी सासरच्या लोकांकडून तिच्यावर वारंवार दबाव टाकला जात होता. इतकेच नाही तर, ‘दुसऱ्या लग्नाला माझी हरकत नाही’, असं तिला चक्क बाँड पेपरवर लिहून देण्यासाठी मारहाण करून सक्ती केली जात होती. सततचा अपमान आणि होत असलेल्या मारहाणीमुळे भक्ती प्रचंड तणावाखाली होत्या.

उपचारादरम्यान मृत्यू

या जाचाला कंटाळून अखेर 2 फेब्रुवारी 2026 रोजी भक्ती यांनी आपल्या राहत्या घरी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. विष प्राशन केल्याचं लक्षात येताच त्यांना तातडीने बीड येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. प्रकृती खालावल्याने नंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. महिनाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर, उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

सासरच्या तीन जणांवर गुन्हा दाखल

या प्रकरणी भक्ती यांची आई गंगूबाई प्रभू ठोकळ यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी पती अमोल अर्जुन कोरडे, सासरे अर्जुन साधू कोरडे आणि सासू आशाबाई अर्जुन कोरडे यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अर्जुन घोलवाल करत आहेत. एका आईने आपल्या मुलीला गमावल्यानंतर व्यक्त केलेल्या भावनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तीन मुलींच्या डोक्यावरचे आईचे छत्र हरवल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. पुढील तपास पिंपळनेर पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *