मुंबईमध्ये सुरू असलेल्या बहुप्रतिक्षित गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचं काम मुंबई महापालिकेकडून सुरू आहे. यामध्ये तिसऱ्या टप्प्याच्या कामाला वेग आला आहे. लिंक रोडच्या तिसऱ्या टप्प्यात जुळ्या बोगद्यांचं बांधकाम होणार आहे. या कामाला 11 मार्च, बुधवारपासून सुरूवात झाला आहे. हा मार्ग येत्या काही वर्षांत पूर्ण होणार असून, मुंबईतील पूर्व आणि पश्चिम परिसरांना थेट जोडणी मिळणार आहे.
जुळे बोगद्यांसाठी आधुनिक यंत्र
गोरेगावमधील दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरातून या बोगद्यांचं काम सुरू आहे. हे बोगदे अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या ‘टनल बोरिंग मशीन’ म्हणजेच खनन संयंत्रने खोदण्यात येणार आहेत. गेल्या माहिन्यापासून हे मशीन खाली उतरवण्यासाठी ‘शाफ्ट’, म्हणजे एक खड्डा खोदण्याचं काम सुरू होतं. हे काम गेल्या आठवड्यात पूर्ण झाले आणि आता बुधवारी हे मशीन शाफ्टमध्ये उतरवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी यावेळी वैयक्तिकरित्या प्रकल्पाची पाहणी केली. त्यांच्या उपस्थित या कामाची सुरूवाती करण्यात आली होती.
जुळ्या बोगद्यांसाठी खोदकाम सुरू करण्यासाठी 800 आणि 350 मेट्रिक टन क्षमतेचे अत्याधुनिक क्रेन यास्थळी कार्यरत आहेत. या क्रेनचा वापर करूव टनल बोरिंग मशीनचे वेगवेगळे भाग एक-एक करून खाली उतरवण्यात येत आहेत. सर्व भाग उतरवताच ही मशीन खाली जोडून खोदकाम सुरू करणार आहे. पहिल्या दिवशी टाइप ए शील्डला खाली उतरवण्यात आलं होतं. या मशीनचं वजन 135 मेट्रिक टन असून हे हाताळताना कामगारांच्या सुरक्षेकडे सर्वाधिक लक्ष दिलं जात आहे.
कसा असेल जुळ्या बोगद्यांचा मार्ग?
लिंक रोडच्या पहिल्या टप्प्यात दिंडोशी न्यायालय आणि दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यान उड्डाणपुलाचं काम सुरू आहे. हे काम 75 टक्के पूर्ण झालं असून, पावसाळ्यापूर्वी म्हणजे 31 मे पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. हा संपूर्ण मार्ग 12.20 किमी लांब आहे. या प्रकल्पाच्या 3-बी टप्प्यात गोरेगावमधील फिल्म सिटी ने मुलुंडमधील खिंडीपाडापर्यंत दोन भुयारी जुळे बोगदे तयार करण्यात येत आहेत. प्रत्येक बोगदा 4.70 किमी लांब असेल. हे 14.420 मीटर रुंद बोगदे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जातील.
