रूममध्ये सोबत राहणाऱ्या मैत्रिणींकडून मिळणाऱ्या सततच्या धमक्या आणि मानसिक त्रासाला कंटाळून १९ वर्षीय तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना चंदननगर परिसरात घडली आहे. पायल राजगुरू असे या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी संबंधित तिघींविरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पायल ही चंदननगर परिसरातील महावीर सोसायटीमध्ये राहत होती. त्याच रूममध्ये तिच्यासोबत काही मुलीही वास्तव्याला होत्या. गेल्या काही दिवसांपासून या तरुणींमध्ये काही कारणास्तव वाद सुरू होते. आरोप आहे की, पायलसोबत राहणाऱ्या त्या मुली तिला सातत्याने मानसिक त्रास देत होत्या. तिची समाजात बदनामी करण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. एवढेच नव्हे, तर ‘तुझ्या आई-वडिलांना मारून टाकू’, अशा आशयाच्या धमक्या देऊन तिला भीतीखाली ठेवण्यात आले होते.
