मुंबईकरांचा उपनगरी रेल्वेवरील प्रवास आरामदायी करण्यासाठी प्रस्तावित केलेल्या वातानुकूलित ‘वंदे मेट्रो’ लोकलच्या खरेदीप्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) २,८५६ एसी ‘वंदे मेट्रो’ डब्यांच्या खरेदीसाठी काढलेल्या निविदा आता १५ मे रोजी उघडल्या जाणार आहेत. बोलीदारांकडून उपस्थित करण्यात आलेल्या शंकांमुळे हा बदल करण्यात आला. यापूर्वी एप्रिलमध्ये निविदा उघडण्याचे नियोजन होते.
कशी असेल नवी लोकल?
लोकल प्रवासी क्षमतावाढीसह ‘वंदे मेट्रो’च्या धर्तीवरील नव्या वैशिष्ट्यांनी सुसज्ज असलेली एसी लोकल धावती करण्यासाठी एमआरव्हीसीकडून बांधणी करण्यात येत आहे. यासाठी वाढती प्रवासी मागणी लक्षात घेता १२ आणि १५ डब्यांपाठोपाठ आवश्यकतेनुसार १८ डब्यांच्या एसी लोकलचीही बांधणी करण्यात येणार आहे. मुंबईकरांची प्रवासी गरज लक्षात घेता, एमआरव्हीसीने निविदापूर्व बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीत इच्छुक बोलीदारांकडून शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार एमआरव्हीसीने त्यांच्या शंकांचे योग्य निरसन करण्यासाठी वेळ घेतला आहे. परिणामी, निविदा आता एप्रिलऐवजी १५ मेपर्यंत उघडण्यात येणार आहेत. याचा या लोकलच्या निर्मितीच्या वेळापत्रकावर परिणाम होणार नाही, असा दावा एमआरव्हीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला.
एप्रिलऐवजी १५ मेपर्यंत निविदा उघडल्यानंतर येत्या चार ते सहा महिन्यांत निविदाप्रक्रिया पूर्ण होईल. करार करून कार्यादेश दिल्यानंतर अडीच वर्षांत पहिली नमुना एसी लोकल मुंबईत अपेक्षित आहे. त्यानंतर त्याची चाचणी पार पडणार आहे. ती यशस्वी झाल्यानंतर येत्या चार ते सहा वर्षांत संपूर्ण ताफा दाखल होईल. एसी लोकलमुळे मुंबईच्या उपनगरी रेल्वेसेवेत मोठा बदल अपेक्षित आहे. सध्याच्या एसी लोकलपेक्षा अधिक क्षमतेचे, जलद प्रवेग असलेले आणि आधुनिक सुविधांनी सज्ज असे ‘वंदे मेट्रो’ रेक उपनगरीय मार्गांवर धावणार आहेत. दरवाजे, माहिती प्रणाली, ऊर्जा बचत तंत्रज्ञान आणि प्रवाशांसाठी अधिक आरामदायी व्यवस्था अशी वैशिष्ट्ये या नव्या रेकमध्ये असणार आहेत.
अशा असणार सुविधा
- प्रवासी सुरक्षेसाठी संपूर्ण गाडीत धूर व आगशोध व अलार्म प्रणाली
- सीसीटीव्ही, पॅसेंजर इमर्जन्सी अलार्म, इमर्जन्सी टॉक बँक
- प्रवासी चढ-उतारावर लक्ष ठेवण्यासाठी डब्याच्या बाहेर सीसीटीव्ही
- डब्याच्या बाह्यभागावर गन्तव्य स्थानक दिसणारे उच्च दृश्यतेचे एलईडी
- प्रवासीसंख्येनुसार स्वयंचलित पद्धतीने हवा नियंत्रित करणारी यंत्रणा
- उच्च कार्यक्षमतेची फिल्टरेशन सुविधा
ताफ्यात येणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक
- १५ मे २०२६ मध्ये निविदा खुली होणार
- ४ ते ६ महिन्यांत प्रक्रिया पूर्ण
- करारानंतर अडीच वर्षांत पहिली चाचणी एसी लोकल
- लोकलच्या यशस्वी चाचणीनंतर ४ ते ६ वर्षांत संपूर्ण ताफा
अशी असेल एसी लोकल
- डब्यांची जोडणी असल्याने गर्दीचे विभाजन शक्य
- डब्याच्या आतील यंत्रणा छतावर, तळाला असल्याने अधिक मोकळी जागा
- गादीयुक्त आसने, दिव्यांग, व्हीलचेअरवरील प्रवाशांसाठी राखीव जागा
