मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटातील अमृत अंजन पुलाजवळील तीव्र उतार व वळणावर मासे वाहतूक करणाऱ्या कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्याने गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक मार्गावर उलटून अपघात झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, दोघांना किरकोळ दुखापत झाली. हा अपघात शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास झाला.
खंडाळा घाटात झालेल्या या अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. बोरघाट (दस्तुरी) महामार्ग पोलिस आणि यंत्रणांनी युद्धपातळीवर अपघातग्रस्त ट्रक बाजूला हटवून अर्ध्या तासात मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत केली.
बोरघाट (दस्तुरी) महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंध्रप्रदेश येथून मुंबईकडे मासे घेऊन जाणाऱ्या कंटेनरचे (क्रमांक-एपी-१६/टीएफ-३३७९) अमृत अंजन पुलाजवळील तीव्र उतार व वळणावर ब्रेक निकामी झाले. यामुळे कंटेनर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर मार्गावर उलटून अपघात झाला. या अपघातात कंटेनर चालकासह त्याच्या सहायक किरकोळ जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच बोरघाट दस्तुरी महामार्गाचे सहायक पोलिस निरीक्षक स्वप्निल पाटील यांनी सहकार्यांसह घटनास्थळी धाव घेत घटनेची पहाणी करून आयआरबी पेट्रोलिंग, महामार्ग वाहतूक पोलीस (बोरघाट), डेल्टा फोर्स महाराष्ट्र सुरक्षा बल तसेच मृत्युंजय देवदूत आपत्कालीन पथकाच्या मदतीने युध्दपातळीवर अपघातग्रस्त कंटेनर क्रेनच्या सहाय्याने बाजूला केला. तसेच कंटेनर मधून गळती झालेल्या ऑईलवर माती टाकून पाण्याने धुऊन घेत मार्ग वाहतुकीसाठी खुला करत पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत केली.
या दरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक वलवण एक्झिट येथून जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावरून वळवण्यात आली होती.
