सातारामधील फलटण तालुक्यातील धोम-बलकवडी कालव्यात बुडून तीन परप्रांतीय कामगारांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना काल गुरुवारी दुपारी घडली आहे. मूळचे ओडिशातील असलेले तिन्ही कामगार हे प्रियियम चिकफिड कंपनीत काम करत होते. फलटण तालुक्यातील हिंगणगाव ते आदर्की रस्त्याखालून जाणाऱ्या कालव्यातील पोटपाटाच्या सिमेंट पाईपमध्ये अडकल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती लोणंदचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपात्रे यांनी दिली.
सिमेंटच्या पाईपमध्ये अडकले
यासंदर्भात लोणंद पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फलटण तालुक्यातील प्रिमियम चिकफिड प्रा. लि. कंपनीतील तीन कामगार पोहण्यासाठी धोम-बलकवडी कालव्यात उतरले होते. कॅनॉलचे पाणी जाण्याकरीता असणाऱ्या पोटपाटाच्या सिमेंटच्या पाईपमध्ये अडकून बुडाल्याने प्रिमियम चिकफिड कंपनीतील ज्योतिर्मय भागीरथी नाईक (वय 22), सतीन बिरची नाईक (वय 35) आणि श्रीराम जगाई हेबरम (वय 20, सध्या रा. हिंगणगाव, मूळ रा. ओरिसा) या तीन कामगारांचा मृत्यू झाला. या घटनेची फिर्याद शाम बाळू भगत यांनी दिली दिली आहे.
एकाला वाचवायला गेले अन्…
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने लोकांना नदी, विहीर आणि कालव्यात पोहण्याचा मोह आवरत नाही. मात्र, काळजी घेतली नाही तर पोहण्याचा मोह जीवावर बेतू शकतो. पोटपाटाचा पाईप असल्याचं माहीत नसल्याने धोम-बलकवडी कालव्यात मोठी दुर्घटना घडली आहे. कालव्यावर पाण्याच्या वेगात एक तरूण त्या पाईपमध्ये अडकला. त्याला वाचविण्यासाठी गेलेले दोघेही पाईपमध्ये अडकल्याने तिघांचाही बुडून मृत्यू झाला. या घटनेची नोंद लोणंद पोलीस ठाण्यात झाली आहे. उपनिरीक्षक रोहीत हेगडे अधिक तपास करत आहेत.
देशसेवा करताना शहीद
सातारा जिल्ह्यावर शोककळा पसरविणारी घटना समोर आली आहे. सिक्कीममध्ये पहाडी प्रदेशात तैनात असलेला पाटण तालुक्यातील जवान शहीद झाला आहे. बाळकृष्ण विलासराव निकम (वय 41), असे हुतात्मा जवानाचे नाव आहे. ते पाटण तालुक्यातील पिंपळोशी गावचे सुपुत्र होते. सेवानिवृत्तीला अवघे दीड वर्ष बाकी असताना त्यांना वीरमरण आल्याने कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र परिवाराला जबर धक्का बसला आहे. हुतात्मा जवान बाळकृष्ण निकम यांचे प्राथमिक शिक्षण मेष्टेवाडी जिल्हा परिषद शाळेत झाले होते.
