नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील नवरगाव परिसरातील एका धाब्यावर घडलेली धक्कादायक घटना तब्बल सहा महिन्यांनंतर उघडकीस आली आहे. धाब्यावर काम करणाऱ्या आचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर ही घटना पोलिसांपासून लपवण्यासाठी मृतदेह जमिनीत गाडून ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. गुप्त माहितीच्या आधारे नागपूर ग्रामीण पोलीस आणि रामटेक पोलिसांनी संयुक्त कारवाई करत जमिनीत गाडलेला मृतदेह बाहेर काढला. या प्रकरणी धाब्यावरील चार कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची चौकशी सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रताप सिंह महादेव सिंह बैंस उर्फ ठाकूर हा नवरगाव सीमेवरील एका टुरिस्ट धाब्यावर अनेक वर्षांपासून आचारी म्हणून काम करत होता. सुमारे सहा महिन्यांपूर्वी धाब्याच्या परिसरात त्याचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला त्याने दारूच्या नशेत गळफास लावून आत्महत्या केल्याची चर्चा होती. मात्र, घटनेची माहिती पोलिसांना देण्याऐवजी धाब्यावर काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनी मृतदेह धाब्याच्या मागील बाजूस नेऊन जमिनीत गाडून टाकल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या घटनेची कुठेही नोंद न झाल्याने आणि मृत्यूबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर न आल्याने हा प्रकार अनेक महिन्यांपर्यंत गुप्तच राहिला.
दरम्यान, नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाला अलीकडेच या प्रकरणाची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ हालचाली सुरू केल्या. नागपूर ग्रामीण पोलीस आणि रामटेक पोलिसांचे पथक नवरगाव येथील संबंधित धाब्यावर पोहोचले. महसूल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत धाब्याच्या मागील परिसरात संशयित जागेवर खोदकाम करण्यात आले. काही वेळाच्या शोधानंतर जमिनीत गाडलेला मृतदेह आढळून आला.
घटनास्थळी फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीमही दाखल झाली होती. त्यांनी परिसराची बारकाईने तपासणी करत महत्त्वाचे पुरावे गोळा केले. मृत्यूचे नेमके कारण काय आहे, तसेच हा आत्महत्येचा प्रकार आहे की त्यामागे अन्य काही कारण आहे, याबाबत अधिक स्पष्टता पोस्टमॉर्टम अहवालानंतर मिळणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात धाब्यावर काम करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांनी मृतदेह जमिनीत का गाडला, यामागे कोणते कारण होते, तसेच या घटनेत आणखी कोणी सहभागी आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे. दरम्यान, सहा महिन्यांनंतर उघडकीस आलेल्या या घटनेमुळे नवरगाव परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
