अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीमधील श्री गणेश केमिकल या कंपनीला सोमवारी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमरात भीषण आग लागली. ही आग एवढी भीषण होती की आगीची लोट कंपनीपासून तीन ते चार किलोमीटर लांबून दिसून येत होते. या कंपनीच्या शेजारी असणाऱ्या इतर दोन कंपन्यांपर्यंत देखील हे आगीचे लोट पोहोचले होते. मात्र, अग्निशमन दलाने वेळीच तिथे पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
आग लागल्यानंतर कंपनीतील केमिकल ड्रम्सचा स्फोट
वेळीच मदत मिळाल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. आणि तातडीने कंपनीतील सर्व कामगारांना बाहेर काढण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा कोणीही जखमी झाले नाही. आग लागल्यानंतर कंपनीतील केमिकलच्या ड्रम्सचा एकापाठोपाठ स्फोट झाला. ज्याचे हादरे संपूर्ण आनंदनगर एमआयडीसीला जाणवले. कंपनीमध्ये केमिकल्सचा मोठा साठा असल्याने स्फोटांची तीव्रता अधिक प्रमाणात होती. स्फोटानंतर ड्रममधील केमिकल रस्त्यांवर पसरले होते. त्यामुळे रस्त्यांवरही आग पसरली होती.
श्री गणेश केमिकल कंपनीचे लाखोंचे नुकसान
दरम्यान, काहीवेळाने तळोजा एमआयडीसी, अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिका, उल्हासनगर आणि कल्याण महापालिकेच्या अग्निशमनच्या गाड्याही घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी जवळजवळ 8 वाजून 30 मिनिटांपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर कूलिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले. दरम्यान, घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दी जमली होती. मात्र, स्फोट होऊ लागल्यानंतर सर्वजण सुरक्षास्थळी पळत होते. रस्त्यांवर आग पसरल्यामुळे पोलीसांना गर्दीवर नियंत्रण मिळवणे कठीण जात होते. या स्फोटामुळे कंपनीचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
अमरावतीत कापसाच्या जिनिंगला भीषण आग
दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी मध्ये आज कापसाच्या जिनिंगला अचानक भीषण आग लागल्याची बातमी समोर आली आहे. ज्यामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील राठी यांच्या कापूस जिनिंगला आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच काही शेतकऱ्यांचा कापूसही या आगीत जळून राख झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले आहे. आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूराचे साम्राज्य निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
