अहवाल आल्यावर पाहू हे उपमुख्यमंत्री बोलू शकतात; पण, एक पत्नी नाही’, असं म्हणत शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना सल्ला दिला. दिल्लीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रासाठी उपस्थित असणाऱ्या राऊतांनी ‘सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री असून, त्या फडणवीसांच्या केबिनेटमध्ये आहेत. याबाबत त्यांनी अधिक जोर लावून मुख्यमंत्र्यांना सागावं’ असा आग्रही सूर आळवला.
तपासयंत्रणांचा अहवाल येऊदे मग पाहू हे एक उपमुख्यमंत्री बोलू शकतात. पण, एक पत्नी बोलू शकत नाही, जिनं अशा पद्धतीनं आपला पती गमावला आहे, मुलं ज्यांनी आपला बाप गमावला ते असं बोलू शकत नाहीत. हे माझं वैयक्तिक मत आहे’, असं राऊत म्हणाले. अजित पवारांच्या अपघाती निधनामध्ये काही संशय असेल तर पवार कुटुंबातील दोन्ही पक्षांनी, रोहित पवारांनी समोर आणलेलं संशोधन योग्य असेल तर आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्य मंत्रिमंडळामध्ये हा विषय उपस्थित केला पाहिजे असं ते ठामपणे म्हणाले.
सीएम फडणवीस दादांच्या स्मारकाचं बोलतात ते ठीक आहे, पण, त्या स्मारकापेक्षा गंभीर मुद्दा असा आहे की ज्या संशयास्पद स्थितीत त्यांचा मृत्यू झाला त्याच्यावर बोलणं आणि माहिती देणं असं सुचवत अहवाल येईल आणि मग बोलू हे त्याच्यावरचं उत्तर नाही असाच टोला राऊतांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.
सीबीआय चौकशीसाठी इतका वेळ का लागतो?
सरकारमध्ये असून सीबीआय चौकशीसाठी इतका वेळ का लागतो? असा थेट प्रश्न उपस्थित करत अहवाल स्वच्छ नाही, विमान कंपनीच्या मालकाला वाचवण्याचा प्रयत्न हे रोहित पवार सांगतात त्यात तथ्य आहे, याचाच पुरुच्चार राऊतांनी केला. ‘फडणवीस नेहमी म्हणतात माझा जीवाभावाचा मित्र गेला वगैरे, मग लपवता का? वी.के सिंह भाजपचा सदस्य आहे का? त्यानं तुम्हाला निवडणुका लढवण्यासाठी पैसे दिले आहेत का? काय ते एकदा सांगा. आम्ही या मुद्द्यावर वारंवार बोलतो, मात्र आता सुनेत्रावहिनींनी बोललं पाहिजे. अजित पवारांच्या दोन्ही मुलांनी हा विषय गांभीर्यानं पुढे नेला पाहिले. या देशातील अनेक नेते विमानप्रवास करतात, देशभरातील नागरिक प्रवास करतात. सर्वांनाच मोदींप्रमाणं हवाई दलाचं विमान फिरण्यासाठी मिळत नाही. आम्ही जीव धोक्यात घालून प्रवास करायचा का?’ असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
