मंदिरात दोन मुलींचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. सूरतच्या दिंडोली परिसरातील सानिया कानडे रोडवरील आत्मीय संस्कारधाम स्वामीनारायण मंदिराच्या बाथरूममध्ये दोन तरुणी मृतावस्थेत आढळल्या आहेत. मृतांची ओळख पटली आहे. 18 वर्षीय रोशनी शरद शिरसाठ आणि 20 वर्षीय जोसना अतुल चौधरी अशी त्यांची नावं आहेत. त्या दोघीही उधना सिटीझन कॉलेजच्या विद्यार्थिनी आहेत.
कॉलेजसाठी गेल्यानंतर परतल्याच नाहीत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही मुली शुक्रवारी सकाळी कॉलेजला जाण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. पण संध्याकाळपर्यंत त्या घरी परतल्याच नाहीत. पोलिसांना कळवल्यानंतर सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं. पोलिसांनी त्यांच्या मोबाईल फोनच्या अखेरच्या लोकेशनच्या आधारे माहिती मिळवली. मंदिर परिसरात त्या अखेरच्या आल्याचं निष्पन्न झालं. शनिवारी पोलीस शोध घेत असताना मंदिर परिसरात त्यांच्या स्कूटर पार्क केल्याचं आढळलं.
सीसीटीव्हीत बाथरुमच्या दिशेने जाताना कैद
मुलींचे कुटुंबीय वारंवार त्यांना फोन करुन संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. मात्र मुली काहीच उत्तर देत नव्हत्या. पोलिसांनी मंदिरातील सीसीटीव्ही तपासलं असता दोन्ही मुली बाथरुमच्या दिशेने चालत जात असल्याचं दिसलं. पोलीस बाथरुममध्ये पाहण्यासाठी पोहोचले असता आतून दरवाजा बंद होता. यानंतर पोलीस दरवाजा तोडून आत गेले.
पोलीस आत गेले असता दोन्ही मुली मृतावस्थेत आढळल्या. त्यांच्या शेजारी सीरिंज आणि विषारी औषधाच्या तीन बाटल्या पोलिसांना आढळळ्या. मंदिरात मृतदेह सापडल्याचं समजल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती.
आत्महत्या करण्यासाठी AI ची मदत
घटनेची माहिती मिळताच दिंडोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पुढील तपासात आढळून आले की मुलींनी AI प्लॅटफॉर्मवर “आत्महत्या कशी करावी” याची माहिती शोधली होती.
सिरिंज, ड्रग्जच्या बाटल्या आणि मुलींचे मोबाईल फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
बाथरुममध्ये विषाचे पॅकेट्स सापडले – पोलीस
या घटनेबाबत दिंडोली पोलीस निरीक्षक आर. जे. चुडासामा म्हणाले की, माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मंदिर परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आहेत. फुटेजनुसार, दोन्ही तरुणी संध्याकाळी 7.15 च्या सुमारास मंदिरात पोहोचल्या आणि 7.30 च्या सुमारास बाथरूमकडे गेल्या. बाथरूममध्ये पोलिसांना विषाचे पॅकेटही आढळले, जे तपासणीसाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल) येथे पाठवले जातील.
त्यांनी पुढे सांगितले की, कुटुंबातील सदस्यांचे जबाब सध्या नोंदवले जात आहेत आणि या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
दिंडोली ठाण्यातील पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. पोस्टमॉर्टम आणि फॉरेन्सिक तपासणी पूर्ण झाल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
