रत्नागिरीत एका बंद असलेल्या कारमध्ये तरुणाची बॉडी आढळल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. रत्नागिरी शहरालगत असलेल्या एकदंत नगरकडे जाणाऱ्या फाट्याजवळ एका कारमध्ये शुद्ध हरपलेल्या अवस्थेत ४३ वर्षीय व्यक्ती आढळली होती. वैभव जयप्रकाश सावंतदेसाई (रा. नवेदरवाडी खेडशी, रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवार, २ मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. एकदंतनगर फाट्याजवळ एक अर्टिगा कार (क्रमांक MH-08-AN-8904) बराच वेळ उभी होती. कारच्या काचांना बाष्प जमा झाल्याचे पाहून स्थानिक नागरिकांना संशय आला.
काही लोकांनी जेव्हा जवळ जाऊन पाहिलं, तेव्हा वैभव सावंतदेसाई हे कारची ड्रायव्हर सीट मागे करुन झोपलेल्या अवस्थेत दिसून आले. नागरिकांनी त्यांना आवाज दिला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
तोंडाला फेस, हालचाल बंद
परिस्थितीचं गांभीर्य ओळखून उपस्थित नागरिकांनी गाडीची काच फोडली आणि दरवाजा उघडला. त्यावेळी सावंतदेसाई यांच्या शरीराची कोणतीही हालचाल होत नव्हती आणि त्यांच्या तोंडातून फेस आलेला होता. नागरिकांनी तातडीने त्यांना त्याच कारमधून जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं, मात्र रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केलं.
या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. वैभव सावंतदेसाई यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप अस्पष्ट असून शवविच्छेदन अहवालानंतरच अधिक माहिती समोर येईल. रत्नागिरी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
