विकासदराबाबत महाराष्ट्र शेजारच्या गुजरात आणि कर्नाटकपेक्षाही मागे पडल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. “विकसित महाराष्ट्र, मजबूत महाराष्ट्र’ अशी घोषणा देणाऱ्या महायुती सरकारच्या काळात राज्याचा विकास मात्र खुंटला आहे. विकासदराबाबतीत महाराष्ट्र राज्य शेजारच्या गुजरात, तामिळनाडू आणि कर्नाटकपेक्षा मागे पडले आहे असे 2025-26 च्या आर्थिक पाहणी अहवालातील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. राज्याची अर्थव्यवस्था 2024-25 च्या तुलनेत यंदा 7.9 टक्के दराने वाढण्याचा अंदाज अहवालात वर्तवण्यात आला आहे.
कोणत्या राज्याचा विकासदर किती?
कर्नाटकचा विकासदरवाढ हा 65 टक्के इतका असून गुजरातचा विकासदर 48 टक्क्यांवर आहे. तामिळनाडूचा विकासदर 47 टक्के इतका आहे. महाराष्ट्रचा विकासदर हा 43 टक्के इतका आहे. म्हणजेच कर्नाटकपेक्षा महाराष्ट्राचा विकसदर 20 टक्क्यांनी मंदावला आहे. मात्र असं असलं तरी महाराष्ट्र अजूनही देशातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था (सर्वाधिक एकूण जीएसडीपी) आहे. सर्वात मोठी अर्थव्यवस्था असूनही महाराष्ट्र अव्वल चार राज्यांमध्ये सर्वात संथ गतीने विकास करत असल्याचं आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.
कर्जाचा बोजा 93 हजार कोटींनी वाढणार
राज्यावरील कर्जाचा बोजा वाढतोय. मार्च 2026 अखेर महाराष्ट्रावर 9.32 लाख कोटी रुपयांचे कर्ज होईल, असा अंदाज आहे. गेल्या वर्षी हा आकडा 8.39 लाख कोटी होता. त्यात वर्षभरात 93 हजार कोटींची वाढ होईल, असा अंदाज आहे.
कृषी व संलग्न क्षेत्रात पाच टक्क्यांची पीछेहाट
गेल्या वर्षी चांगला पाऊस होऊनही कृषी व संलग्न क्षेत्रात आधीच्या वर्षाच्या तुलनेत जवळपास पाच टक्क्यांची पीछेहाट झाली आहे. उद्योग, बांधकाम आणि सेवा क्षेत्राने राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळ दिल्याने विकास दर चालू आर्थिक वर्षात 7.9 टक्के राहील व राष्ट्रीय विकास दरापेक्षा तो अधिक असल्याचा अंदाज आर्थिक पाहणी अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
स्थिती उत्तम असल्याचं चित्र उभं करण्यात आलं
राज्याची आर्थिक स्थिती उत्तम असून, सर्व क्षेत्रांमध्ये चांगली प्रगती होत असल्याचे चित्र विधिमंडळाला सादर करण्यात आलेल्या आर्थिक पाहणी अहवालातून उभे करण्यात आले आहे. चालू आर्थिक वर्षात (2025-26) देशाचा विकास दर हा 7.4 टक्के अपेक्षित आहे. महाराष्ट्राचा विकास दर हा 7.9 टक्के असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कृषी व संलग्न क्षेत्राचा विकास दर हा 3.4 टक्के, सेवा क्षेत्र 9 टक्के तर उद्योगाचा विकास दर 5.7 टक्के असेल, असा अंदाज आहे.
पाऊस चांगला तरीही….
गेल्या वर्षी सरासरीच्या 109 टक्के एवढा चांगला पाऊस राज्यात झाला होता. पण कृषी व संलग्न क्षेत्रात विकास दर 3.4 टक्के एवढाच असेल, अशी शक्यता आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात कृषी क्षेत्रात विकास दर हा सुधारित अर्थसंकल्पानुसार 9.1 टक्के होता. या तुलनेत कृषी क्षेत्राच्या विकास दरात 5.4 टक्के घसरण झाली आहे. चांगला पाऊस झाला तरीही पिकांचे झालेले नुकसान, अवेळी पावसाने शेतीला बसलेला फटका यातून कृषी क्षेत्राला फटका बसल्याचे निरीक्षण अहवालात नोंदविण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीत सर्वाधिक वाटा मुंबई विमानतळाचा
देशातील हवाई वाहतुकीचे क्षेत्र विस्तारत असताना यामध्ये महाराष्ट्राचाही मोठा वाटा आहे. राज्यात एकूण 13 विमानतळं असून, त्यापैकी सहा विमानतळ आंतरराष्ट्रीय आहेत. या 13 विमानतळांवरून 2024-25 या वर्षात 3 लाख 82 हजार देशांतर्गत उड्डाणे पार पडली आहेत. त्या आधीच्या वर्षी हे प्रमाण 3 लाख 68 हजार होते. राज्याच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीपैकी सर्वाधिक वाटा मुंबई विमानतळाचा आहे. 2024-25 मध्ये प्रवासी संख्येतही वाढ झाली असून, मालवाहतुकीचे प्रमाणही देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढले आहे. यासंदर्भात राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात माहिती समोर आली आहे.
मुंबईतून 2023-24 च्या तुलनेत 2024-25 मध्ये विमान उड्डाणांची संख्या कमी झाली. मात्र, देशांतर्गत प्रवासी संख्येमध्ये वाढ झाली आहे. मुंबईतून 2024-25 मध्ये 2 लाख 40 हजार विमानांची उड्डाणे झाली. राज्यातील देशांतर्गत हवाई वाहतुकीच्या तुलनेत हे प्रमाण 62 टक्के आहे. या आधीच्या वर्षी मुंबईतून 2 लाख 41 हजार 813 विमानांचे उड्डाण झाले होते. हे प्रमाण राज्याच्या देशांतर्गत हवाई वाहतुकीच्या तुलनेत 65.56 टक्के होते. आकडेवारीसोबतच विमान उड्डाणांची टक्केवारीही घटलेली असली तरी प्रवासी संख्येत मात्र वाढ दिसत आहे. मुंबईतून 2024-25 मध्ये 5 कोटी 48 लाख प्रवाशांनी देशांतर्गत प्रवास केला. 2023-24 मध्ये 5 कोटी 24 लाख प्रवाशांनी मुंबईहून देशांतर्गत प्रवास केला होता.
