‘हे कौतुक करण्यासारखंच,’ संजय राऊतांना पटला भाजपाचा निर्णय; म्हणाले ‘हा कार्यकर्त्याचा सन्मान’

2019 मध्ये राज्यात उमेदवारी नाकारण्यात आलेल्या विनोद तावडेंना आता राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाने संधी दिली आहे. यानिमित्ताने विनोद तावडेंचं राजकीय पुनर्वसन केलं जात असल्याचं बोललं जात आहे. भाजपाने विनोद तावडेंना उमेदवार दिलेल्या संजय राऊतांनी भाजपाचं कौतुक केलं आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातून एका विशिष्ट गटाने विनोद तावडे यांच्यासारख्या नेत्याला राजकाराणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असा दावाही केला आहे.

“विनोद तावडेंचं राजकीय पुनर्वसन वाटत नाही. कारण विनोद तावडे यांच्यासारखे कार्यकर्ते हे सतत पक्षाचं काम करत असतात. मी त्यांना फार आधीपासून ओळखतो. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून ते दिल्लीपर्यंत त्यांनी काम केलं आहे. बिहार, केरळात त्यांनी काम केलं. अशावेळी पक्षाने त्यांच्या कार्याची दखल घेतली आणि उमेदवारी दिली तर तो सन्मान असतो,” असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

“महाराष्ट्रातून एका विशिष्ट गटाने विनोद तावडे यांच्यासारख्या नेत्याला राजकारणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण नाउमेद न होता त्यांनी पक्ष संघटनेचं काम सुरु ठेवलं. त्यांना दिल्लीत केलेल्या कामाचं यश मिळालं आहे. कामाचा गौरव केला जातो तेव्हा कार्यकर्त्याचं कौतुक केलं पाहिजे. भाजपाने जे उमेदवार दिले आहेत ते कौतुक करण्यासारखेच आहेत याबाबत माझ्या मनात शंका नाही,” असं त्यांनी म्हटलं आहे.

“काल सर्वानुमते ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावावर सगळ्यांनी सहमती दर्शवली. खरं म्हणजे आदित्य ठाकरे सातत्याने सांगत होते की, शिवसेना मोठा पक्ष आहे, त्यामुळे ही जागा शिवसेनेले लढलं पाहिजे. ही भूमिका योग्य होती. त्यानंतर 16 आकड्यासह काँग्रेस आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 आहेत तरी आम्ही ही जागा शरद पवारांसाठी सर्वांनी सोडली आहे. त्यांनी पुन्हा राज्यासभेत जावं यासाठी हा निर्णय घेतला,” अशी माहिती संजय राऊतांनी दिली आहे.

“उद्धव ठाकरे, काँग्रेससोबत चर्चा झाली. शद पवारांचे राजकारण, समाजातील, देशातील जे नेतृत्व आहे त्यासाठी ही जागा तिघांनी जाहीर केली आहे. जिंकण्यासाठी लागते तेवढी आमदारांची संख्या आमच्याकडे आहे. महाविकास आघाडी येत्या काळात काय निर्णय घ्यायचे आणि निवडणूक लढायची यासाठी एकत्र बसणार आहे. तिन्ही पक्षांचा आपापला वाटा आहे. राष्ट्रवादीला राज्यसभा मिळाल्याने आता काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात चर्चा होईल,” असं ते म्हणाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण न होण्याच्या अटीवर जागा शरद पवारांसाठी सोडली का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले, “जयतं पाटील यांनी काल भूमिका स्पष्ट केली. माझं मत पहिल्यापासून, अजित पवार असल्यापासून मत होतं की, विलिनीकरण दंतकथा आहे. त्यातून काही निष्पन्न होणार नाही आणि तशी शक्यताही दिसत नव्हती. ही दंतकथा आता संपलेली आहे. आम्हाला यापुढे महाविकास आघाडी म्हणूनच काम करावं लागेल. आमची मानसिक तयारी आहे. सत्ता येते आणि जाते. विरोधी पक्षाची जबाबादारी नीट पार पाडली पाहिजे. महाराष्ट्र, देशात भाजपाची सर्व सरकारं अपयशी ठरली आहेत. विरोधी पक्षात असणाऱ्यांनी सत्तेच्या मागे जाऊ नये. निवडणुकांची तयारी करावी आणि पुढील कामाला लागावं”.

प्रियंका चतुर्वेदी यांच्या उमेदवारीसंदर्भात विचारलं असता ते म्हणाले, “त्यांच्यासाठी सर्वांच्या प्रार्थना होत्या. त्या आमच्या सहकारी होत्या. राज्यसभेत उत्तम काम करत होत्या. गणित जुळत नसल्याने त्यांना बाहेर बसावं लागलं आहे. जर शरद पवार नसते तर शिवसेना 100 टक्के लढवून त्यांना जागा देण्यास अडचण नव्हती. ही जागा शिवसेनेने लढावी अशी इच्छा होती. पण शरद पवारांना पाठिंबा दिला पाहिजे असं ठरलं”.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *