मुख्यमंत्र्यांमुळेच महाराष्ट्राची बदनामी: शिवसेना

मुख्यमंत्र्यांमुळेच महाराष्ट्राची बदनामी: शिवसेना

शिवसेनेच्या कृत्यानं नव्हे तर मुख्यमंत्र्यांच्या बोटचेप्या भूमिकेनेच शिवरायांच्या महाराष्ट्राची आणि पोलीस दलाची बदनामी झाली, असं सडेतोड उत्तर शिवसेनेनं दिलं आहे.

तुकाराम ओंबळेसारख्या पोलिसांवर ज्यांनी गोळ्या झाडल्या, त्यांच्याच संरक्षणासाठी पोलीस दलाला उतरवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची खरी बदनामी केला, असा पलटवार शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला.

शिवसेनेने पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद कसुरी यांच्या मुंबईतील पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला विरोध केला होता. विरोध दर्शवताना शिवसेनेने आयोजक सुधींद्र कुलकर्णी यांना काळं फासलं. शिवसेनेच्या या कृत्यामुळे महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिमा मलिन झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. त्याला शिवसेनेने उत्तर दिलं आहे.

“मुख्यमंत्री म्हणतात शिवसेनेच्या आंदोलनामुळे महाराष्ट्राची बदनामी झाली. मात्र मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र कळलेलाच नाही. मुख्यमंत्र्यांच्या विधानामुळे आणि पाकधर्जिण्या कृतीमुळे महाराष्ट्राची बदनामी झाली आहे. शिवसेना प्रखर राष्ट्रवादी आहे.त्याच राष्ट्रवादी भूमिकेतून पाकिस्तानी कार्यक्रमास विरोध केला.पण ज्या तुकाराम ओंबळेंसारख्या पोलिसांनी पाकिस्तानशी लढताना मुंबईत हौतात्म्य पत्करले, ते पोलिस दल मुख्यमंत्र्यांनी पाकड्यांच्या संरक्षणासाठी उतरवून शहिदांचा आणि शिवरायांच्या महाराष्ट्राचा अपमान केला”, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.

पाकिस्तानशी लढणे हा गुन्हा असेल, तर तो गुन्हा शिवसेनेनं केला आहे.त्यामुळे महाराष्ट्राचा स्वाभिमानी राष्ट्राभिमानी बाणा देशाने पाहिला, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *