श्रद्धा की अंधश्रद्धा? खडकी देवळ्यातील यात्रेत बाळांना कळसावरून सोडण्याच्या प्रथेवर प्रश्नचिन्ह

खडकी देवळा गावातील कानिफनाथ मंदिराच्या यात्रेत दरवर्षी हजारो भाविकांची गर्दी उसळते. भक्तीभाव, नवस आणि परंपरेचा उत्साह यामध्ये गावाचे वातावरण रंगते. मात्र या यात्रेशी संबंधित एक धक्कादायक प्रथा पुन्हा चर्चेत आली आहे. लहान बाळांना मंदिराच्या उंच कळसावर नेऊन खाली उभ्या असलेल्या लोकांच्या चादरीत सोडण्याची पद्धत येथे अजूनही पाळली जात असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे बालकांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. श्रद्धेच्या नावाखाली नेमके काय घडते, याबाबत आता विविध स्तरांतून चर्चा सुरू झाली आहे.

यात्रेतील धोकादायक विधी

खडकी देवळा येथील कानिफनाथ मंदिर परिसरात भरत असलेल्या यात्रेत हा प्रकार उघडकीस आल्याचे सांगितले जाते. दर्शनासाठी आलेल्या माहेरवाशिणी आणि कुटुंबीय चिमुल्यांना घेऊन मंदिरात येतात. नवस पूर्ण झाल्याच्या श्रद्धेतून काही पालक बाळला मंदिराच्या कळसावर नेतात. तेथून खाली उभ्या असलेल्या 4 व्यक्ती चादर ताणून उभ्या असतात आणि बाळाला त्या चादरीत सोडले जाते. काही सेकंदांचा हा प्रकार पाहताना उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकतो.

कळसाची उंची, हातातील समन्वय आणि क्षणिक चूक यामुळे मोठा धोका संभवतो. चादर नीट ताणली गेली नाही, पकड सुटली किंवा तोल गेला तर गंभीर अपघात होऊ शकतो. त्यामुळे या प्रथेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

संतापाची लाट आणि कारवाईची मागणी

ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरू असल्याचे स्थानिक सांगतात. मात्र बदलत्या काळात अशा पद्धतींकडे नव्या दृष्टीने पाहण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. बालकांच्या जीवाशी खेळ करणारी कोणतीही कृती स्वीकारार्ह नसल्याची भावना समाजमाध्यमांवर उमटत आहे.

मानवी हक्क अभियानचे कार्यकर्ते कल्याण टाकतोडे यांनी या प्रकारावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या मते, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधील फरक ओळखणे आवश्यक आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून या प्रथेला आळा घालावा, अशी मागणी त्यांनी केली आहे

गावात आणि परिसरात याबाबत चर्चा रंगली असून, संबंधित विभागांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस पावले उचलली जातील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *