Go Away म्हणत तिनं त्याला ढकललं! मुंबईच्या रस्त्यांवर भर दिवसा परदेशी महिलेशी गैरवर्तन

 मुंबईत परदेशी पर्यटकांचा राबता सातत्यानं पाहायला मिळतो. विविध देशांतून येणारे पर्यटक या शहरात अगदी हक्कानं फिरतात, स्थानिकांशी संवाद साधतात. तर, काही पर्यटक मुंबईत बऱ्याच दिवसांचा मोठा मुक्कामही करतात. प्रत्येक वेळी हे शहर पर्यटकांसाठी चांगला अनुभव देऊनच जातं असं म्हणणं तसं गैर ठरेल. कारण, ज्या शहरात सामान्य तरुणी, महिलांनासुद्धा छेडछाडीचा सामना करावा लागतो, त्याच शहरात या परदेशी पर्यटकांनाही अशा प्रसंगांना दुर्दैवानं सामोरं जावं लागतं. इथंच महिला सुरक्षिततेचा आणि समाजभानाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर येतो. मुंबईचं हे नकोसं रुप लक्ष वेधण्याचं कारण ठरत आहे सोशल मीडियावरील एक व्हिडीओ.

दोन तरुणांनी परदेशी महिलेचा पाठलाग करत…

मुंबई शहरामध्ये नुकताच परदेशी महिला पर्यटकाला घृणास्पद प्रकाराला सामोरं जावं लागलं, जिथं दोन तरुणांनी सेल्फी घेण्यासाठी म्हणून बळजबरी करत तिला पाठलाग केला. बरं, महिलेनं कॅमेरा सुरू ठेवलेला असतानाही ते मागं हटले नाहीत. एकानं मोबाईल कॅमेरा सुरू करत तिच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी एक पाऊल पुढे टाकताच अखेर या महिलेनं त्याला ‘गो अवे…’ म्हणत दूर लोटलं. घडल्या प्रकरणी तिनं पोलिसांमध्ये तक्रारही नोंदवली.

इनेस फारिया असं या परदेशी महिला पर्यटकाचं नाव. तिनं इन्स्टाग्रामवर या घटनेचा एक व्हिडीओ शेअर करत आपण या शहरात दोन महिन्यांपासून आहोत, आतापर्यंतचा अनुभव अतिशय कमाल होता. मात्र, हा दिवसच वेगळा होता असं तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं. ‘वारंवार नकार देऊनही ते आमचा पाठलाग करतच राहिले. मला अतिशय संकोचल्यासारखं वाटत होतं. मात्र ते अंगलट येतच होते’, असं या परदेशी महिलेनं व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *