गणेशोत्सवानंतर कोकणात जाण्यासाठी सर्वाधिक गर्दी असणारा सिझन म्हणजे होळीचा! मागील काही दिवसांपासूनच शिमग्यासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वाढली आहे. मात्र एकीकडे प्रवाशांची संख्या वाढत असली तरी कोकणात जाणाऱ्या गाड्यांपैकी सर्वात लोकप्रिय गाडी असलेल्या वंदे भारतच्या डब्यांच्या संख्येत वाढ करण्यात आलेली नाही. आजही ही गाडी आठ डब्यांचीच आहे. मात्र या मार्गावरील प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे कोकण रेल्वेच्या मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत 20 डब्यांची असावी अशी मागणी करण्यात आली आहे. केवळ मागणी न करता यासंदर्भातील पत्रच रेल्वे मंडळ आणि रेल्वे मंत्रालयाला देण्यात आलं आहे.
प्रवासी आहेत पण डबे मर्यादित
होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या विशेष गाड्या सोडण्यात येतात. नियमित रेल्वे गाड्यांच्या तिकीटांना अधिक मागणी आहे. त्यातच वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास करण्यासाठी प्रवासी उत्सुक आहेत. मात्र यात वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास करण्यासाठी प्रवासी उत्सुक आहेत. परंतु, गाडी क्रमांक 22229 / 22230 सीएसएमटी – मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस आठ डब्यांची असल्याने, प्रवाशांना आरक्षित तिकीट मिळत नाही. त्यामुळे ही एक्स्प्रेसला 20 डब्यांची असावी अशी मागणी केली जात आहे.
भरपूर वेटींग
गोवा आणि कोकण रेल्वे मार्गावर जून 2023 पासून वंदे भारत एक्स्प्रेस धावते. महाराष्ट्रातील सर्वाधिक मागणी असलेल्या वंदे भारत ट्रेनमध्ये या ट्रेनचा समावेश होतो. या ट्रेनच्या तिकीटांना कायमच अधिक मागणी असते. त्यामुळेच ट्रेनला भरपूर वेटींग असतं. अनेकदा या ट्रेनची तिकीटं मिळत नाहीत.
पर्यटकांची पहिली पसंती
सण उत्सव आणि सुट्ट्याच्या कालावधीत कोकण आणि गोव्यात जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. वंदे भारत एक्स्प्रेसच्या माध्यमातून स्वस्त आणि वेगवान प्रवास शक्य असल्याने, केवळ कोकणातच नाही तर गोव्याला जाणारे पर्यटकही या रेल्वे प्रवासाला अधिक प्राधान्य देतात. मात्र, वंदे भारत एक्स्प्रेसचे डबे कमी असल्याने, तिकीटांची संख्या मर्यादित असते. त्यामुळेच प्रवाशांना इच्छित दिवसाचे आरक्षित तिकीट मिळत नाही.
90 टक्क्यांचा नियम लागू करण्याची मागणी
ज्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या प्रवाशांची संख्या 90 टक्क्यांपेक्षा अधिक आहे, त्या अपग्रेड करुन आता 16 किंवा 20 डब्यांच्या चालवण्याचं धोरण भारतीय रेल्वेने स्वीकारलं आहे. याच तत्वानुसार 90 टक्क्यांपेक्षा अधिक प्रवासी सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास करत आहेत. मात्र असं असतानाही या ट्रेनचे डबे वाढवले जात नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
