नागपूरमधील यशोधरानगर परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. घरातील विश्वासाच्या नात्यातूनच एका विवाहित महिलेवर गैरवर्तन झाल्याची तक्रार समोर आली आहे. 30 वर्षीय भाच्याने दोन वेगवेगळ्या दिवशी मामीसोबत अयोग्य वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेनंतर महिलेने धाडसाने पोलिसांकडे धाव घेतली. तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. मात्र याचा प्रकरणाचा घटनाक्रम डोकं चक्रावणारा आहे. या प्रकरणामुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून पुढील तपास सुरू आहे.
यशोधरानगरमध्ये धक्कादायक प्रकार
ही घटना नागपूर शहरातील यशोधरानगर परिसरात घडली. पीडित महिला आपल्या कुटुंबासह येथे वास्तव्यास आहे. 15 फेब्रुवारी रोजी दुपारी ती आपल्या बेडरूममध्ये कपाटातून मुलाचे कपडे काढत होती. त्यावेळी तिचा 30 वर्षीय भाचा मोहम्मद अल्तमश सलीम शेख हा खोलीतच झोपलेला होता. महिला खोलीबाहेर जात असताना आरोपीने मागून येत तिला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेने तत्काळ विरोध करत स्वतःची सुटका केली. त्या वेळी आरोपी काहीही न बोलता निघून गेला.
दुसऱ्यांदा पुन्हा गैरवर्तनाचा प्रयत्न
पहिल्या घटनेनंतर काही दिवसांनी 24 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास आरोपी पुन्हा महिलेच्या घरी गेला. त्या वेळी महिला घरात एकटी होती. आरोपीने बेडरूममध्ये जाऊन तिच्या मागून हात धरत अश्लील वर्तन केले, असा आरोप आहे. घाबरून न जाता महिलेने धैर्य दाखवत त्याला जोरात ढकलले आणि त्वरित बाहेर पडली. या प्रकारानंतर तिने यशोधरानगर पोलीस ठाणे येथे अधिकृत तक्रार नोंदवली.
पोलिसांची कारवाई आणि तपास सुरू
तक्रार मिळताच पोलिसांनी आरोपी मोहम्मद अल्तमश सलीम शेख याच्याविरुद्ध छेडछाडीच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीने लक्ष ठेवले जात आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
