आयसीसी वर्ल्ड कप 2026 मधील सुपर-८ फेरीत भारताने झिम्बाब्वेविरुद्ध खेळताना धडाकेबाज फलंदाजीचे प्रदर्शन करत विक्रमांची नवी नोंद केली.भारतीय संघाने फलंदाजीचा अक्षरशः स्फोट घडवून आणत विक्रमांची नवी नोंद केली. झिम्बाब्वेविरुद्ध खेळताना भारताने एका डावात तब्बल १७ षटकार ठोकत टी-२० वर्ल्ड कपमधील आपल्या इतिहासातील सर्वाधिक षटकारांचा मान पटकावला. यापूर्वी भारताने एका डावात १५ षटकार मारले होते, मात्र या सामन्यात तो आकडा पार करत नवा मानदंड प्रस्थापित केला. या तडाखेबाज डावात अभिषेक शर्मा (Abhishek Sharma), हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि तिलक वर्मा (Tilak Varma) यांनी प्रत्येकी ४ षटकारांची आतषबाजी केली. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि संजू सॅमसन (Sanju Samson) यांनी २-२ षटकार लगावले, तर इशान किशन याच्या नावावर एक षटकार नोंदवला गेला.
आधीचा विक्रम मोडला
यापूर्वी २०२४ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने एका डावात १५ षटकार मारले होते. मात्र १७ षटकारांसह हा विक्रम मागे पडला. एकूण स्पर्धेतील विक्रम पाहिला तर वेस्ट इंडिज आणि नेदरलँड्स संयुक्त अव्वल आहेत. वेस्ट इंडिजने २०२६ मधीलच स्पर्धेत झिम्बाब्वेविरुद्ध १९ षटकार ठोकले होते, तर नेदरलँड्सने २०१४ साली आयर्लंडविरुद्ध १९ षटकारांची कामगिरी केली होती. ऑस्ट्रेलियाने २०१० मध्ये भारताविरुद्ध १६ षटकार आणि त्याच वर्षी पाकिस्तानविरुद्ध १४ षटकार मारले होते.
नरेंद्र मोदी स्टेडियमवर धावांचा पाऊस
नरेंद्र मोदी स्टेडियम (Narendra Modi Stadium) येथे झालेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि ४ बाद २५६ धावांचा डोंगर उभारला. सलामीला उतरलेल्या संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी अवघ्या ३.४ षटकांत ४८ धावांची भागीदारी करत जोरदार सुरुवात करून दिली. संजू २४ धावांवर बाद झाल्यानंतर अभिषेकने ईशान किशनसोबत दुसऱ्या विकेटसाठी ४२ चेंडूत ७२ धावा जोडल्या. ईशानने २४ चेंडूत ३८ धावा केल्या, तर अभिषेकने ३० चेंडूत ५५ धावांची आक्रमक खेळी साकारली. १४.५ षटकांत भारताची अवस्था ४ बाद १७२ अशी होती.
येथून पुढे तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या यांनी पाचव्या विकेटसाठी ३१ चेंडूत नाबाद ८४ धावांची भागीदारी करत संघाला २५६/४ पर्यंत पोहोचवले. हार्दिक २३ चेंडूत ५० धावांवर नाबाद राहिला, तर तिलकने १६ चेंडूत ४४ धावांची झंझावाती खेळी केली.
