पालघर जिल्ह्यातील जलमार्गाद्वारे पालघर व वसई तालुक्याला जोडणाऱ्या सफाळेजवळील जलसार जेटी ते विरारजवळील मारंबळपाडा जेटीदरम्यान सुरू करण्यात आलेल्या जलवाहतुकीचा गेल्या दहा महिन्यांत मोठ्या प्रमाणात लाभ प्रवाशांनी घेतला आहे. या कालावधीत एक लाखाहून अधिक प्रवासी, ७८ हजार ४६० वाहने तसेच ७,५४५ जनावरे या जलमार्गातून सुरक्षित वाहून नेण्यात आली आहेत. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांतील प्रवाशांना या सेवेचा मोठा फायदा होत आहे. विशेष म्हणजे, महामार्गावर वाहतूककोंडीतही हा जलमार्ग प्रवाशांना आधार ठरत आहे.
वाहतूक कोंडीला उपाय
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काँक्रिटीकरणाचे काम सुरू असताना, मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे अनेक वेळा नागरिक व प्रवासी अडकून पडत होते आणि त्यांना मनस्ताप सहन करावा लागत होता. भाईंदर ते नायगाव दरम्यानच्या खाडीवर पूल उभारण्याच्या दृष्टीने तसेच वसई तालुक्यातील विरार जवळील नारिंगी ते पालघर तालुक्यातील सफाळे जवळील जलसार किंवा दातीवरेदरम्यान पूल बांधण्याचा प्रस्ताव सुमारे पंधरा वर्षांपूर्वी मंजूर झाला होता. मात्र, निधी उपलब्ध न झाल्याने तो प्रकल्प रखडला. त्यामुळे नागरिकांना वसई, ठाणे, भाईंदर व मुंबईकडे जाण्यासाठी मुंबई-आमदाबाद राष्ट्रीय महामार्गाचाच वापर करावा लागत होता.
दरम्यान, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने ठाणे-भाईंदर जलमार्ग सुरू केल्यानंतर पालघर जिल्ह्यातील जलसार ते मारंबळपाडा या जेटींवरून एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत जलमार्गाद्वारे प्रवासी व वाहन वाहतूक नियमितपणे सुरळीत पार पडली. महामार्गावर मोठी वाहतूककोंडी झाल्याच्या वेळी अनेक प्रवासी, मालवाहू वाहने व अवजड वाहनांनी या जलमार्गाचा वापर करून वेळेची बचत केली आहे.
इथेही फुकटे प्रवासी
महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत प्रवासी सुरक्षा, वेळेचे काटेकोर पालन व सुविधा सुधारणा यांना प्राधान्य दिले जात आहे. भविष्यात सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. दरम्यान, काही प्रवासी तिकीट न घेता प्रवास करत असल्याचे निदर्शनास आले असून, नागरिकांनी तिकीट घेऊनच प्रवास करावा, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन करण्यात आले आहे. सर्व नागरिकांनी या जलमार्ग वाहतूक सेवेचा जास्तीत जास्त लाभघ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
प्रवासी वाहतूक :
एकूण प्रवासी संख्या : १,००,९६३
वाहन वाहतूक :
- सायकल : २६५
- दुचाकी : ५६,५९८
- रिक्षा : ३,४८३
- कार/५ सीटर वाहन : ३,३२०
- प्रवासी ऑटो रिक्षा :१४,५९६
- सहाचाकी मालवाहू गाडी : १६८
- बस/ट्रक : २४
- दहाचाकी मालवाहू गाडी : ६
- अवजड मालवाहतूक : २,२२३
- मेंढी/शेळी वाहतूक : ७,३६७
- टेम्पो इतर वाहने : १२६
- गायी/म्हशी/बैल : ५२
