शहरातील भावसिंगपुरा परिसरात एका तडीपार गुन्हेगाराला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर जीवघेणा हल्ला झाल्याची मोठी घटना समोर आली आहे. या हल्ल्यात आरोपींनी पोलिसांना बेदम मारहाण करत त्यांच्या अंगावरील वर्दी फाडली आणि एका कर्मचाऱ्याच्या हाताचा जोरात चावा घेत त्यांना गंभीर जखमी केले. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी काय माहिती दिली?
ईश्वर राजू चव्हाण (तडीपार गुन्हेगार), सचिन त्रिभुवन, विकास भालेराव, शकुंतला चव्हाण, अंजली चव्हाण, शिला त्रिभुवन आणि पायल त्रिभुवन अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तडीपार करण्यात आलेला सराईत गुन्हेगार ईश्वर चव्हाण हा शहरात शिरल्याची गोपनीय माहिती छावणी पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे बुधवारी रात्री 7:30 वाजेच्या सुमारास पोलीस पथक भावसिंगपुऱ्यातील आमेन चौकात पोहोचले. ईश्वरला पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्याच्या नातेवाइकांनी पोलिसांना घेराव घालून गोंधळ सुरू केला.
आरोपी ईश्वर चव्हाण आणि सचिन त्रिभुवन यांनी पोलीस कॉन्स्टेबल खान यांना मारहाण करत त्यांच्या अंगावरील वर्दी फाडली. याचवेळी ईश्वरने पोलीस अंमलदार सूर्यवंशी यांच्या हाताचा जोरात चावा घेतला. आरोपीला पोलीस वाहनात बसवत असताना त्याने, ‘मी नुकताच हत्येचा प्रकरणातून बाहेर आलो आहे, तुम्हा सर्वांना जिवंत सोडणार नाही,’ अशी धमकी देत सुरा काढून पोलिसांवर वार करण्याचा प्रयत्न केला, जो पोलिसांनी कौशल्याने चुकवला.
स्वतःचे डोके फोडून घेत रचला बनाव
दुसरा आरोपी सचिन त्रिभुवन याने पोलिसांवर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर स्वतःचेच डोके दगडावर आपटून घेतले. ‘मला पोलिसांनी मारहाण केली’, असा खोटा आरडाओरडा करून त्याने जमाव जमवण्याचा प्रयत्न केला आणि गर्दीचा फायदा घेत तेथून पसार झाला. या गंभीर प्रकारानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत ईश्वर चव्हाण, अंजली चव्हाण, शिला त्रिभुवन आणि पायल त्रिभुवन या चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने या आरोपींना 28 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, पोलीस निरीक्षक काकासाहेब नागवे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
