या संपूर्ण आठवड्यात महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे नागरिक त्रस्त झाले होते. मराठवाडा आणि विदर्भात कोसळलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे राज्यावरचं अवकाळी पावसाचं संकट टळलं असून, नागरिकांना पुन्हा उन्हाच्या झळा बसणार का, असा प्रश्न पडला आहे. आज, 27 फेब्रुवारी, दिवसभर हवामान कसं असेल ते पाहुया.
हवामान विभागाचा ताजा अंदाज
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुजरात आणि त्या शेजार भागात सध्या चक्राकार वारे सक्रिय आहेत तसेच दक्षिण कर्नाटकातही असे वारे आहे. राज्यात निर्माण झालेल्या दुहेरी हवामानाचं हेच कारण आहे. दोन्ही दिशेने येणाऱ्या वाऱ्यांमुळे हवामान सतत बदलतं आहे. हवामान विभागाने असाही अंदाज वर्तवला आहे की चक्राकार दाबाचा परिणाम मराठवाडा प्रदेशापर्यंत जाणवत आहे आणि प्राथमिक अंदाजानुसार कमी दाबाचा पट्टा सक्रिय राहण्याची अपेक्षा आहे. IMD दिलेल्या माहितीनुसार, “पुढील 24 तासांत, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे, तर किनारी भागात दमट परिस्थितीमुळे उष्णता अधिक तीव्र होऊ शकते.”
कोकण किनारपट्टीवर दमट वातावरण
कोकण किनारपट्टी आणि मुंबईमध्ये हवामान दमट आणि उष्ण राहील. तापमान अनेक जिल्ह्यांत 32-35 अंश सेल्सिअस दरम्यान राहत असल्यामुळे नागरिकांना उन्हाचा कडाका जाणवत आहे. पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांमध्येही वातावरण उष्ण राहून कोरडं असणार आहे. या जिल्ह्यांत पावसाची शक्यताही नाही त्यामुळे आकाश दिवसभर निरभ्र राहील.
मुंबईत उन्हाच्या झळा
दरम्यान, मुंबईमध्ये वाढू लागलेल्या उन्हाचा परिणाम दिसू लागला आहे. चेहऱ्याभोवती गुंडाळले जाणारे स्कार्फ, एसी लोकलमधील वाढलेली गर्दी, स्थानकांवरही थंड पेयांच्या स्टॉलवर वाढलेली वर्दळ हे त्याचे चिन्ह आहेत. महामुंबई परिसरात आर्द्रता वाढल्याने तसेच, तापमानही अधिक असल्याने उष्म्याची जाणीव तीव्र होऊ लागली आहे. फेब्रुवारीअखेरीस ऋतुबदलाची चाहूल लागल्यानंतर मुंबईतही तापमानातील बदल जाणवू लागला असून असह्य उकाड्याने मुंबईकरांची काहिली होऊ लागली आहे.
