गोंदिया-जबलपूर मार्गाचं दुपदरीकरण, राज्यातील अनेक गावांमध्ये रेल्वेचा विस्तार; 9 हजार कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी

गोंदिया-जबलपूर रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणासह चार राज्यांतील सुमारे ९,७०२ कोटी रुपयांच्या रेल्वे विस्तारीकरण प्रकल्पांना मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. कच्च्या तागाच्या हमीभावात २७५ रुपये प्रती क्विंटल वाढ, श्रीनगर विमानतळावर १,६७७ कोटी रुपये खर्चून ‘सिव्हिल एन्क्लेव्ह’ हे भव्य संकुल बांधणे या ठळक प्रस्तावांनाही या बैठकीत मान्यता देण्यात आली.

सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावरील सेवातीर्थ येथे पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) हलविल्यानंतरची केंद्रीय मंत्रिमंडळाची ही पहिलीच बैठक होती. या बैठकीत मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने (सीसीपीए) रेल्वे मंत्रालयाच्या तीन महत्त्वाच्या रेल्वेमार्ग विस्तारीकरणाच्या प्रकल्पांना मंजुरी दिली. ‘प्रधानमंत्री गतिशक्ती’ राष्ट्रीय योजनेतील या प्रकल्पांमध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील गोंदिया-जबलपूर मार्ग दुपदरीकरणाचा समावेश आहे.

भारतीय रेल्वेचं जाळं वाढणार

महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बिहार आणि झारखंड या चार राज्यांतील आठ जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पांमुळे भारतीय रेल्वेचे जाळे सुमारे ३०७ किलोमीटरने वाढणार आहे. प्रस्तावित प्रकल्पामुळे सुमारे ५,४०७ गावे आणि जवळपास ९८ लाख लोकसंख्येचा रेल्वेसंपर्क व स्थानिक रोजगाराच्या संधींमध्येही वाढ होईल. या रेल्वेमार्ग विस्तारामुळे जबलपूरचे कचनार शिव मंदिर, बालाघाटमधील कान्हा राष्ट्रीय उद्यान, पेंच राष्ट्रीय उद्यान, धुआंधार धबधबा आणि दलमा वन्यजीव अभयारण्य यांसारख्या अनेक पर्यटनस्थळांचा रेल्वेसंपर्क सुधारेल, असाही रेल्वेचा दावा आहे.

मंत्रिमंडळ समितीने २०२६-२७च्या विपणन हंगामासाठी कच्च्या तागाच्या किमान आधारभूत किमतीत सुमारे पावणेतीनशे रुपयांनी वाढ करून ती ५,९२५ रुपये प्रतिक्विंटल करण्यासही मान्यता दिली. यामुळे तागाच्या अखिल भारतीय सरासरी उत्पादन खर्चाच्या तुलनेत ६१.८ टक्के नफा मिळण्याची आशा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *