चंद्रपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सख्या भावानेच आपल्या बहिणीची धारदार शस्त्राने गळा चिरुन हत्या केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात आई देखील गंभीर जखमी झाली आहे. भद्रावती शहरातील झाडे प्लॉट परिसरात ही घटना घडली आहे. सुरज शंकर भोंडे (वय 28) असं आरोपीचं नाव असून संजीवनी शंकर भोंडे (वय 32) असं मृत बहिणीचं नाव आहे. तर पुष्पा शंकर भोंडे (वय 58) असं गंभीर जखमी झालेल्या आईचं नाव आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
संपत्तीच्या वादातून हत्या
संपत्तीच्या वादातून ही घटना झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गेल्या तीन ते चार दिवसापासून घरात वाद सुरु होता. यात आई व बहीण हे स्वतंत्र राहत होते, तर भाऊ आणि वडील वेगळे राहत असल्याची माहिती मिळाली आहे. आज संध्याकाळी झालेल्या जोरदार वादानंतर हा सर्व प्रकार घडला. भद्रावती पोलिसांनी या प्रकरणी आरोपी भावाला अटक केली असून वडिलांना देखील ताब्यात घेतलं आहे. घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.
बहिणीला कोयत्याने वार करून संपवलं
अशीच धक्कादायक घटना नालासोपारा येथे देखील घडली आहे. नालासोपारा शहरात धक्कादायक घटना घडली असून मनोरूग्ण भावाने बहिणीची हत्या केली आहे. तसंच या वादात मध्यस्ती करण्यासाठी गेलेली आईदेखील गंभीर जखमी झाल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. नालासोपारा पूर्वेच्या टाकीरोड येथील सर्वोदय वसाहतीत मंगळवारी पहाटे ही घटना घडली असून या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. वसई विरार शहरातील एकाच आठवड्यातील ही चौथी हत्या आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनोरुग्ण भावाने आपल्या सख्ख्या बहिणीची कोयत्याने वार करून हत्या केली. त्यानंतर भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या आईवरही या तरुणाने हल्ला केला. टाकी रोड येथील सर्वोदय वसाहतीत साईधाम वेल्फेअर चाळ आहे. या चाळीत सुप्रिया कानडे ही ३५ वर्षीय महिला राहते. तिची आई आणि भाऊ शेजारीच राहतात. सुप्रिया कानडे यांचा पती गावी गेला होता. मंगळवारी पहाटे तिचा सख्खा भाऊ अजित मालुष्टे (वय 40) याच्यासोबत तिचे भांडण झाले. या भांडणात अजितने कोयत्याने तिच्यावर वार केला. तिच्या मानेवर आणि छातीवर कोयत्याचे वार झाल्याने ती गंभीर जखमी झाली.
