एकीकडे मुलं हे देशाचं भविष्य असल्याचं म्हटलं जात असतानाच, नागपुरातून एक अत्यंत सुन्न करणारी घटना समोर आली आहे. आई-वडिलांमध्ये वारंवार होणाऱ्या घरगुती वादामुळे सतत तणावात आणि नैराश्यात असलेल्या एका शाळकरी मुलीने राहत्या घरी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. ही हृदयद्रावक घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील न्यू म्हाळगी नगर, शिवाजी लेआऊट येथे घडली आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलगी अवघ्या 8व्या वर्गात शिक्षण घेत होती. गेल्या काही काळापासून तिच्या आई-वडिलांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून सतत घरगुती वाद होत होते. घरातील या कलहाचा आणि दररोजच्या भांडणांचा त्या चिमुरडीच्या मनावर खोलवर परिणाम झाला होता. घरात नेहमी राहणारे तणावाचं वातावरण तिला सहन होत नव्हतं, ज्यामुळे ती सतत नैराश्यात राहत होती. घरातील वातावरण तापलेले असताना, याच नैराश्यातून तिने टोकाचं पाऊल उचलण्याचं ठरवलं. घराच्या एका खोलीत कुणीही नसताना तिने गळफास लावून आत्महत्या केली. काही वेळाने हा प्रकार घरच्यांच्या लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली.
निष्पाप मुलीने आयुष्य संपवलं
इतक्या लहान वयात आणि केवळ घरातील भांडणामुळे एका निष्पाप मुलीने स्वतःचं आयुष्य संपवल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच हुडकेश्वर पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठलं. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह खाली उतरवला आणि उत्तरीय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे रवाना केला.
नागरिकांमध्ये हळहळ
या घटनेमुळे पालकांच्या वादाचा मुलांच्या मानसिकतेवर किती गंभीर परिणाम होऊ शकतो, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. किरकोळ वाटणारे घरगुती वाद मुलांच्या मनावर कायमस्वरूपी जखमा करू शकतात, ज्याचे पर्यावसन अशा दुर्दैवी घटनांमध्ये होते. हुडकेश्वर पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण शिवाजी लेआऊट परिसरात शोककळा पसरली असून, एका हसत्या-खेळत्या मुलीचा असा अंत झाल्यानं नागरिक हळहळत आहेत.
