नाशिक-अक्कलकोट महामार्गाला गती! 30 गावांमधून जाणार रस्ता; कसा असेल 374 किमी लांब मार्ग?

सूरत ते चेन्नई महामार्ग रद्द करून तयार होत असलेल्या नाशिक-अक्कलकोट ग्रीनफिल्ड कॉरिडोरला गती मिळत आहे. या महामार्गाचं काम येत्या 2 वर्षांत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ( NHAI ) दिली आहे. या महामार्गासाठी नाशिक जिल्ह्यातील 107.33 हेक्टर जमीन संपादित करण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.

प्रशासनाने या मार्गावरील बाधित शेतकरी आणि नागरिकांकडून हरकती व सूचना मागवायला सुरुवात केली आहे. यासाठी 21 दिवसांची मुदत दिली असून या नंतर कामांना वेग येणार आहे. एकूण 374 किमी लांब असलेला हा महामार्ग, नाशिकपासून सुरू होऊन थेट चेन्नईपर्यंत जोडतो. यामुळे महाराष्ट्र ते दक्षिण भारत जोडणीला चालना मिळणार आहे. या मार्गावर एकूण 27 मोठे पूल असून, 164 लहान पूल उभारले जाणार आहेत. यामुळे दोन्ही राज्यांमध्ये शेतकरी, उद्योजक, पर्यटकांसह नागरिकांनाही मोठा फायदा होणार आहे.

मार्ग का बदलला?

केंद्र सरकारकडून सुरुवातीला सूरत ते चेन्नई असा मार्ग प्रस्तावित करण्यात आला होता. हा मार्ग 1200 किमी लांब असून बहुतांश भाग महाराष्ट्रातून जात होता. परंतु, राज्यातील शेतकऱ्यांच्या विरोधामुळे या मार्गात मोठे बदल करण्यात आले.त्यामुळे नाशिक ते चेन्नई असा मार्ग ठरला. यामध्ये नाशिक-अक्कलकोट महामार्गाचा समावोश आहे. आता हा नवीन प्रस्तावित मार्ग नाशिकच्या आडगावपासून सुरू होऊन महाराष्ट्रातील अहिल्यानगर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांमधून अक्कलकोटला जोडणार आहे.

कोणत्या गावांमधून जाणार मार्ग?

आता हा मार्ग नेमका कोणत्या गावांमधून जाणार आहे याची यादी समोर आली आहे. या यादीवर प्रशासनाने हरकती मागवल्या असून पुढील 21 दिवसांत काम सुरू करण्याचं उद्दिष्ट आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड, सिन्नर आणि नाशिक तालुक्यातील एकूण 30 गावांमधून हा महामार्ग जाणार आहे. नाशिक तालुक्यातील आडगावपासून मार्ग सुरू होऊन पुढे विंचूरगवळी ते निफाडमधील दारणासांगवी, सावळी, चाटोरी, चेहडी, हेदारणा, लालपाडी, रामनगर, पिंपळगाव निपानी आणि तळवाले या गावांमधून मार्ग जाणार आहे.

शिवाय सिन्नर तालुक्यातील देशवंडी, पाटपिंपरी, बारनाव पिंपरी, निमगाव सिन्नर, गुळवंच, देवपूर, खोपडी, फर्दापूर, धारणगाव, भोकणी, पांगरी, फुलेनगर, वावी थोडेवाडी आणि कहांडलवाडी या गावांमधून मार्ग तयार करण्याचा प्रस्ताव आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *