महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं संकट कायम, अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाचा ‘यलो अलर्ट’; 24 तास महत्त्वाचे

महाराष्ट्राला गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसानं झोडपलं असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. लातूर मध्यरात्री आणि सोमवारी सकाळी पाऊस पडला. रेणापूर तालुक्यात सायंकाळी चार ते पाचच्या दरम्यान गारपिटीमुळे काही ठिकाणी पत्र्याची घरे पडली आहेत; तसेच गहू, हरभरा आणि ज्वारीच्या पिकाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. परंतु, मुंबईमध्ये उन्हाचा तडाखा वाढलेलाच दिसत आहे. आज, 25 फेब्रुवारीला, दिवसभर राज्यातील हवामान कसं असेल ते जाणून घेऊया.

विदर्भात मोठे नुकसान

काही दिवसांपासून होणाऱ्या अवकाळी पावसाचा फटका विदर्भातील नागपूर, भंडारा, वर्धा, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यांना बसला आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास बरसलेल्या या सरींमुळे रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील काही भागात गारपीट झाल्याने नुकसानीची तीव्रता वाढली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या 24 तासांत या भागांमध्ये पावसाची शक्यता कायम आहे.

कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट?

राज्यातील सोलापूर, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत आज दिवसभर हलक्या सरींसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शिवाय मराठवाडा आणि विदर्भला हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विर्दभातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये आज, बुधवारी वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागने वर्तवली आहे.

मुंबईत पारा चढणार

दरम्यान, मुंबईमध्ये उकाडा कायम आहे. मंगळवारी संपूर्ण शहरात सरासरीपेक्षा 3.2 अंश अधिक तापमान नोंदवलं गेलं होतं. मुंबईमध्ये तापमानाचा पारा बुधवारी 25 फेब्रुवारी रोजीही चढाच असेल, असा अंदाज आहे. त्यानंतर दोन दिवस एखाद्या अंशांनी कमाल तापमानात दिलासा मिळेल, परंतु हा दिलासा फार काळ मिळणार नसून पुन्हा एकदा तापमान चढू लागेल, अशी शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरात दोन दिवसांनी तापमानाचा पारा चढू लागेल. आठवडाभर हे चढे तापमान कायम असेल, अशी शक्यता आहे.

पावसामुळे मोठं नुकसान

सोमवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी ज्वारीचे धाट आडवे पडले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांनी ‘मटा’शी बोलताना दिली. रेणापूर तालुक्यात झालेल्या पिकाच्या आणि घराच्या नुकसानाचे सर्वेक्षण करून तातडीने पंचनामे करून शेतकर् यांना आणि ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना सरकारने विनविलंब नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी माजी आमदार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष धीरज देशमुख यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *