स्वारगेट अत्याचाराला एक वर्ष उलटलं, एसटी स्थानकात अजूनही ढिसाळ व्यवस्था; सुरक्षारक्षक, पोलिस कुठे?

सुरक्षारक्षक, पोलिसांची अनुपस्थिती… ठरावीक भागांत अंधाराचे साम्राज्य… कमी वर्दळीच्या भागाकडे दुर्लक्ष अन् बसचे उघडे दरवाजे… असे चित्र स्वारगेट एसटी स्थानकात मंगळवारी पहाटे पाहायला मिळाले. स्वारगेट एसटी स्थानकातील बलात्काराच्या घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या सर्वच यंत्रणांनी त्या वेळी उपाययोजनांची सरबत्ती केली. मात्र, त्या उपाययोजनांचा विसर पडल्याचेच पाहणीत दिसून आले.

स्वारगेट एसटी स्थानकात प्रवासी तरुणीवर बलात्कार झाल्याच्या धक्कादायक घटनेला आज, बुधवारी एक वर्ष पूर्ण होत आहे. यानंतर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना जाहीर करूनही वर्षभरानंतर प्रत्यक्ष पाहणी केली असता, स्वारगेट एसटी स्थानकातील सुरक्षाव्यवस्था अजूनही अपुरी व ढिसाळ असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्वारगेट एसटी स्थानकात सोलापूर व सांगली मार्गांवरील बस उभ्या राहतात, तेथे प्रवाशांची वर्दळ अत्यल्प असते. मात्र, येथे ठोस सुरक्षाव्यवस्था नसल्याने संशयास्पद व्यक्ती बसचा गैरवापर करू शकते, अशी परिस्थिती आहे.

एसटी स्थानक परिसरात खासगी वाहनांना मुक्त प्रवेश असल्याचेही पाहणीदरम्यान दिसले.  स्थानक परिसरात फेरी मारूनही त्याला कुणी अडवले नाही. दिवसाही दुचाकी, कार आणि रिक्षा मोठ्या प्रमाणात स्थानकात प्रवेश करतात. सीसीटीव्ही, प्रकाश व्यवस्था, सुरक्षारक्षक, महिला हेल्प डेस्क यांसारख्या उपाययोजनांचाही अभाव आहे.

पहाटे सुरक्षारक्षक, पोलिसांचा खडा पहारा ना

 पहाटे चार ते पाच या वेळेत स्वारगेट एसटी स्थानकात प्रत्यक्ष पाहणी केली. चारच्या सुमारास स्थानकात एकही सुरक्षारक्षक अथवा पोलिस कर्मचारी आढळला नाही. पहाटे पाचच्या सुमारास दोन पोलिस कर्मचारी स्थानकात दाखल झाले, त्याच वेळी दोन सुरक्षारक्षकही अचानक हजर झाले. यामुळे सुरक्षेच्या नियमित उपस्थितीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. स्वारगेट स्थानकात सुरक्षारक्षक व पोलिसांचा खडा पहारा राहील, असे बलात्काराच्या घटनेनंतर सांगण्यात आले होते. मात्र, तसे चित्र आता दिसत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *