कॉल सेंटरच्या नावाखाली सुरू असणाऱ्या अनेक चुकीच्या कामांचा खुलासा आजवरल गुन्हे आणि पोलीस शाखेनं केला असून याच कॉल सेंटरच्या कार्यवाहीवर लक्ष असताना आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलं. ज्यामध्ये अंबरनाथमध्ये पोलिसांनी एका बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केल्याचं कळलं. या कॉल सेंटरमधून सॉफ्टवेअर विकण्याच्या नावाखाली लाजिरवाणं काम सुरू होतं. जिथं अमेरिकी नागरिकांना गंडा घातला जात होता.
कॉल सेंटरच्या नावाखाली सुरू असणाऱ्या या फसवणुकीअंतर्गत हजारो अमेरिकी नागरिकांकडून कोट्यवधी रुपये लुबाडण्यात आल्याची शक्यता आहे. ‘रुद्र टेक आयटी सर्व्हिस’ असं या बनावट कॉल सेंटरचं नाव आहे. अंबरनाथ पश्चिमेच्या ग्लोब बिझनेस सेंटरमध्ये तिसऱ्या माळ्यावर हे कॉल सेंटर सुरू होतं. या कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिवसाला अमेरिकन नागरिकांना लुटण्याचं टार्गेट ठरवून दिलं जात होतं. त्यानुसार हे कर्मचारी अमेरिकन नागरिकांना कॉल करून वेबसाईट डेव्हलपमेंट आणि सॉफ्टवेअर विकण्याच्या नावाखाली संपर्क साधायचे आणि त्यांच्याकडून 100 ते 200 डॉलर ऍडव्हान्स मागवायचे.
मागवण्यात आलेले हे पैसे ते बिट कॉईन अकाऊंटमध्ये जमा करायचे. तसंच एकदा पैसे आले, की त्या अमेरिकन नागरिकाला ब्लॉक केलं जायचं. अंदाजे या कॉल सेंटर मधून शंभर ते दीडशे अमेरिकन नागरिकांना फोनवरून संपर्क साधला जायचा, त्यातील एखादा अमेरिकन नागरिक त्यांच्या जाळ्यात अडकायचा अशी या कॉल सेंटरची त्यांची मोडस होती.
कॉल सेंटरचा बनाव रचत सुरू असणाऱ्या या प्रकरणाची माहिती मिळताच अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी मंगळवार (24 फेब्रुवारी 2026) रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास या कॉल सेंटरवर धाड टाकली. ही कारवाई बुधवारी सकाळी 7 वाजेपर्यंत सकाळपर्यंत सुरू होती. या कारवाईत पोलिसांनी कॉल सेंटरमधले लॅपटॉप, कॉम्प्युटर, मोबाईल फोन्स जप्त केले. तसंच अमेरिकी नागरिकांना गंडा घालणारा कॉल सेंटरचा मालक कमलेश सचवानी याच्यासह एकूण 5 जणांना बेड्या ठोकल्या. यात अजूनही काही जणांचा समावेश असुन याचा पोलीस तपास करत असून यात किती रुपयांचा व्यवहार झाला असल्याची माहिती पोलीस घेत आहेत.
