ठाणे शहारासह अनेक भागांमध्ये चोरी करणाऱ्यांनी घरफोडण्याची वेगळीच पद्धत शोधली आहे. रात्री अनोळखी व्यक्ती दरवाजे वाजवण्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली असून पोलिसांनी विशेष दक्षतेचा इशारा दिला आहे. घर सुरक्षित आहे असे गृहीत धरून राहणे धोकादायक ठरू शकते, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा काळ जवळ येत असल्याने अनेक कुटुंबे बाहेरगावी जाणार आहेत आणि याच संधीचा फायदा चोरटे घेतात. त्यामुळे साध्या पण महत्त्वाच्या सुरक्षा सवयी अंगीकारणे अत्यावश्यक बनले आहे. दरम्यान एका गोष्टीची विशेष काळजी घ्यावी.
684 चोरीचे गुन्हे आणि…
ठाणे शहर पोलिस आयुक्तालयात मागील 1 वर्षात चोरीचे एकूण 684 गुन्हे नोंदवले गेले. त्यापैकी 349 प्रकरणे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. या कारवाईदरम्यान 479 आरोपींना अटक करण्यात आली.
या आरोपींकडून सुमारे 4 कोटी 20 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस उपायुक्त (गुन्हे शाखा) अमरसिंह जाधव यांनी नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन केले आहे. शहरात गस्त वाढवण्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे.
दरवाजा उघडण्यापूर्वी खात्री करा
अनेक घरांत दरवाजावर टकटक होताच लोक घाईत कडी उघडतात. बाहेर कोण आहे हे न पाहता दरवाजा उघडणे मोठा धोका ठरू शकतो. मुख्य दरवाजाला डोअर लेन्स असणे आवश्यक आहे.
ओळखीची व्यक्ती असल्याची खात्री झाल्याशिवाय दरवाजा उघडू नये. कुरिअर, प्लंबर किंवा पोलिस असल्याचे सांगून फसवणूक करणाऱ्या टोळ्याही सक्रिय असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
आधुनिक लेन्स आणि दुहेरी सुरक्षा
बाजारात आता वाइड अँगल प्रकारच्या आधुनिक लेन्स उपलब्ध आहेत. यामुळे फक्त समोरची व्यक्ती नव्हे तर आसपास लपलेली हालचालही दिसते. या लेन्स बसवणे सोपे आणि परवडणारे आहे. डिजिटल लेन्सचाही पर्याय नागरिक निवडू शकतात.
मुख्य दरवाजासोबत बाहेरून चॅनल गेट किंवा लोखंडी जाळीचा दरवाजा बसविल्यास अतिरिक्त संरक्षण मिळते. ही दुहेरी सुरक्षा घरफोडी टाळण्यात उपयोगी ठरते.
घराच्या प्रवेशद्वारावर किंवा गॅलरीत सीसीटीव्ही कॅमेरा असल्यास चोरट्यांवर मानसिक दबाव निर्माण होतो. सोसायट्यांनी सुरक्षा रक्षक, नोंद वही आणि कॅमेऱ्यांचे नियम काटेकोर पाळावेत.
संशयास्पद व्यक्ती दिसल्यास किंवा कोणतीही शंका आल्यास त्वरित 112 हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी केले आहे.
रात्री दरवाजा वाजल्यास काय कराल?
मध्यरात्री बेल वाजली तर घाबरू नका, शांत राहा. आधी लेन्समधून पाहा आणि खात्री करा. संशयास्पद वाटल्यास दरवाजा उघडू नका.
खिडकीतून बोलणे, सोसायटीच्या वॉचमनला कळवणे किंवा शेजाऱ्यांना संपर्क करणे हा सुरक्षित मार्ग आहे. आपत्कालीन परिस्थितीत घरातील लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी 112 क्रमांक लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
