नालासोपारा शहरात धक्कादायक घटना घडली असून मनोरूग्ण भावाने बहिणीची हत्या केली आहे. तसंच या वादात मध्यस्ती करण्यासाठी गेलेली आईदेखील गंभीर जखमी झाल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. नालासोपारा पूर्वेच्या टाकीरोड येथील सर्वोदय वसाहतीत मंगळवारी पहाटे ही घटना घडली असून या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. वसई विरार शहरातील एकाच आठवड्यातील ही चौथी हत्या आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनोरुग्ण भावाने आपल्या सख्ख्या बहिणीची कोयत्याने वार करून हत्या केली. त्यानंतर भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या आईवरही या तरुणाने हल्ला केला. टाकी रोड येथील सर्वोदय वसाहतीत साईधाम वेल्फेअर चाळ आहे. या चाळीत सुप्रिया कानडे ही ३५ वर्षीय महिला राहते. तिची आई आणि भाऊ शेजारीच राहतात. सुप्रिया कानडे यांचा पती गावी गेला होता. मंगळवारी पहाटे तिचा सख्खा भाऊ अजित मालुष्टे (४०) याच्यासोबत तिचे भांडण झाले. या भांडणात अजितने कोयत्याने तिच्यावर वार केला. तिच्या मानेवर आणि छातीवर कोयत्याचे वार झाल्याने ती गंभीर जखमी झाली.
मुलाचं आणि मुलीचं भांडण सुरू असल्याचं पाहिल्यानंतर हे भांडण सोडवण्यासाठी त्यांची आई मध्ये पडली. मात्र मनोरुग्ण असलेल्या तरुणाने तेव्हा तिच्यावरही वार केले. या हल्ल्यात आई देखील गंभीर जखमी झाली. तसंच सुप्रियाचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी असलेल्या आईला पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
“मला सकाळी साडेपाच वाजता या घटनेची माहिती मिळाली, तेव्हा सुप्रिया रक्ताच्या थारोळ्या पडली होती. तिचा भाऊ मनोरुग्ण होता. त्याने कोयत्याचा वार करून तिची हत्या केली,” अशी माहिती नालासोपाऱ्यातील स्थानिक रहिवाशी महेंद्र कदम यांनी दिली.
दरम्यान, कौटुंबिक वादानंतर झालेल्या या तरुणीच्या हत्याकांडानंतर नालासोपरा परिसरात खळबळ उडाली होती. नालासोपारा तुळींज पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली असून या घटनेचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे.
