अजित पवारांची बारामती सुनेत्रा पवारांच्याच हाती, पोटनिवडणुकीसाठी उमेदवार फिक्स; बैठकीत मोठा निर्णय

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीची तयारी निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. या विधानसभा मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त मतदारयादी पुनर्परीक्षण कार्यक्रम आयोगाने जाहीर केला असून 1 जानेवारी 2026 पर्यंत नाव नोंदवलेले मतदार या पोटनिवडणुकीत मतदान करू शकणार आहेत. या मतदारसंघासाठी 10 मार्चला अंतिम प्रारुप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारावर शिक्कामोर्तब झाला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणूक लढवणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत पोटनिवडणूक लढण्यावर सर्वांचं एकमत झालं आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बारामती निवडणूक बिनविरोध करण्यावर भर असणार आहे.

पार्थ पवार राज्यसभेवर जाणार?

आगामी राज्यसभा निवडणुकीत पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील, असा निर्णय पक्षाकडून घेण्यात आल्याची माहिती देखील मिळाली आहे आहे. सोमवारी 23 फेब्रुवारी रोजी रात्री मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या झालेल्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती मिळाली आहे. सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत पार्थ पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. प्रफुल पटेल यांच्या मुंबईतील निवासस्थानी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित होते.

सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राजभवन येथे झालेल्या कार्यक्रमात राज्यपालांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. तसेच सध्या सुरु असलेल्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे सुनेत्रा पवार यांच्यासाठी पहिलं अधिवेशन आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *