गर्भपाताच्या गोळ्या घेतल्या, 28 वर्षीय महिलेला पडलं महागात; अतिरक्तस्रावाने हृदयद्रावक अंत

जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाट नांद्रे परिसरात एक हृदयद्रावक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. गर्भपातासाठी घेतलेल्या गोळ्यांचं सेवन एका 28 वर्षीय महिलेच्या जीवावर बेतले असून, तब्बल 13 दिवसांच्या मृत्यूशी झुंझीनंतर या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेनं संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.

आयशा समीर मुल्ला (रा. घाट नांद्रे) असं मृत महिलेचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयशा यांनी 10 फेब्रुवारीच्या सुमारास गर्भपाताच्या गोळ्यांचे सेवन केले होते. त्यानंतर त्यांना अचानक त्रास जाणवू लागला आणि मोठ्या प्रमाणावर अतिरक्तस्राव सुरू झाला. प्रकृती खालावल्याने नातेवाईकांनी त्यांना तातडीने सिल्लोड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे सुमारे 10 दिवस त्यांच्यावर उपचार करण्यात आले, मात्र प्रकृतीत कोणतीही सुधारणा न झाल्याने आणि प्रकृती अधिकच चिंताजनक बनल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय घाटी रुग्णालयात हलवण्यात आले. घाटी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, काल सोमवारी रोजी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास उपचार सुरू असतानाच आयशा यांचा मृत्यू झाला. गर्भपाताच्या गोळ्यांच्या सेवनानंतर झालेल्या अतिरक्तस्रावामुळेच त्यांचा जीव गेल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *