राज्यसभेसाठी भाजपचं धक्कातंत्र, जुना नियम लावण्याचे संकेत, विनोद तावडेंच्या नावाची चर्चा

राज्यसभा उमेदवार देताना भाजप धक्कातंत्राचा अवलंब करण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये सध्या विनोद तावडे , विनय सहस्रबुद्धे , सुनील देवधर यांच्या नावांची चर्चा आहे. धैर्यशील पाटील हे पोटनिवडणुकीत राज्यसभेवर गेल्याने त्यांना पुन्हा संधी मिळू शकते. याशिवाय भाजपच्या कोट्यातून रामदास आठवले यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते. शिवसेनेतून माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या नावाची चर्चा आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार यांचे नाव पुढे येण्याची शक्यता आहे.

निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या ३७ जागांसाठी निवडणुकीची घोषणा बुधवारी केली. या निवडणुकीसाठी १६ मार्च रोजी मतदान होईल. यंदा दोन टप्प्यात होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात, २ एप्रिल रोजी निवृत्त होणाऱ्यांपैकी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह राज्यातील सर्वाधिक सात जागा रिकाम्या होणार आहेत. ७ जागांपैकी ६ जागा भाजप महायुतीला आणि केवळ १ जागा महाविकास आघाडीला मिळेल, असे विधानसभेतील पक्षीय संख्याबळ सांगते.

भाजपचा जुना नियम

सत्तारूढ भाजप सर्वसामान्य परिस्थितीत एका खासदाराला पुन्हा राज्यसभेवर संधी देत नाही, हा पूर्वानुभव असल्याने केंद्रीय मंत्री रामदास आठवले वगळता माजी मंत्री भागवत कराड व धैर्यशील पाटील यांची राज्यसभा कारकीर्द संपुष्टात येणार, हेही जवळपास स्पष्ट आहे. विधानसभा व संसदेतील सध्याचे पक्षीय संख्याबळ पाहता या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा तोटा होणार हे स्पष्ट असून, फक्त एका जागेवर त्यांना आपला उमेदवार निवडून आणता येईल. या स्थितीत तीन पक्ष मिळून या एकमेव जागेवरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उबाठा पक्ष हे तीन पक्ष राज्यसभेवर संधी देतील ते भाग्यवान कोण असणार, याची उत्सुकता आहे.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला पराभव पत्करावा लागल्यावर जवळजवळ दोन वर्षांपासून महाराष्ट्रातून राज्यसभेत भाजपची ताकद लक्षणीयरीत्या वाढणार आहे. कार्यकाळ संपत असलेल्या महाराष्ट्रातील खासदारांमध्ये शरद पवार, आठवलेंसह तिन्ही भाजप सदस्य, फौजिया खान (राष्ट्रवादी), प्रियंका चतुर्वेदी (उबाठा), रजनी पाटील (काँग्रेस) यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *