माणसाला आयुष्यभर सोबत आणि आधाराची गरज असते. आयुष्याच्या उत्तरार्धात ही पोकळी अधिक जाणवते. या एकाकीपणावर मात करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथील 82 वर्षीय सेवानिवृत्त शिक्षकाने दुसऱ्यांदा विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे त्यांना तीन मुले, तीन सुना, तीन मुली, तीन जावई, आणि चक्क 22 नातवंडे आहेत. मुलांच्या संमतीने आजोबांनी 56 वर्षीय महिलेसोबत विवाह केला आहे. चौधरी शेख हुसेन शेख अहमद, असे विवाह केलेल्या सेवानिवृत्त शिक्षकाचं नाव आहे. आजोबांच्या या विवाहाची जिल्ह्याभरात चर्चा होत आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, चौधरी शेख हुसेन शेख अहमद हे मूळचे माहूर तालुक्यातील रहिवासी असून धर्माबाद तालुक्यात उर्दू माध्यमाचे शिक्षक म्हणून कार्यरत होते. तिथेचं वास्तव्यास होतेले. 22 वर्षांपूर्वी शेख हुसेन चौधरी हे वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले होते. त्यांचा खादरबी हुसेन साहेब यांच्या सोबत पहिला विवाह झाला होता. त्यांना तीन मुले, तीन मुली, सुना,जावई आणि तब्बल 22 नातवंडे झाली आहेत. त्यापैकी काही नातवांचेही लग्न झालेली आहेत. दरम्यान काळात पत्नीचा दीड वर्षापूर्वी मृत्यू झाला. पत्नीच्या निधनानंतर ते एकटे पडले. ते मुलं आणि सुनांबरोबर राहत असले तरी मनात एकटेपणाची जाणीव होती. तेव्हा त्यांनी वयाच्या 82 व्या वर्षी विवाह करण्याचा निर्णय घेतला. मुलांसमोर त्यांनी ही इच्छा जाणून दाखवली, सुरुवातीला मुलांनी विरोध केला. पण वडिलांच्या आनंदासाठी कुटुंबीयांनी सहमती दर्शवली. त्यानंतर 30 जानेवारी रोजी तेलंगाना राज्यातील भैंसा येथील येथे वास्तव्यात असलेल्या अमिनाबेगम अहमद हुसेन यांच्याशी विवाह केला.
