वहिनी ही एका प्रकारे दुसरी आईच असते. मात्र अलीकडेच या नात्याला काळिमा फासणारं प्रकरण उघडकीस आलं आहे. उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगर जिल्ह्यातील बसी कलां या गावात निर्मळ नातेसंबंधांना हादरवणारी धक्कादायक घटना घडली. प्रेमसंबंधांना घरच्यांचा विरोध होत असल्याने संतापलेल्या 25 वर्षांच्या तरुणीने घरातच भयंकर कट रचल्याचा आरोप आहे. एका रात्री अचानक संपूर्ण कुटुंब बेशुद्ध अवस्थेत आढळल्याने गावात खळबळ उडाली. सुरुवातीला घरात चोरी किंवा बाहेरून हल्ला झाल्याची चर्चा होती. मात्र तपास जसजसा पुढे गेला तसतशी घटना वेगळ्याच दिशेने वळली. अखेर काही तासांतच या प्रकरणामागील सत्य समोर आले आणि सर्वांनाच मोठा धक्का बसला.
प्रेमसंबंधातून सुरू झाला वाद
पोलीस माहितीनुसार बसी कलां गावातील आना (25) हिचे त्याच गावातील आदिल नावाच्या युवकासोबत सुमारे 2 वर्षांपासून संबंध होते. कुटुंबीयांनी या नात्याला विरोध केला होता. तरीही दोघे संपर्कात राहात होते. आना हिची वहिनी फिरदौस वारंवार तिला समज देत असे. यामुळे घरात तणाव वाढत गेला आणि नंदेच्या मनात राग साचत गेला.
कुटुंबाला नशा देऊन बेशुद्ध केले
सोमवारी रात्री आनाने परिसरातील एका ओळखीच्या तरुणाकडून झोपेच्या गोळ्या मागवल्या. जेवणासाठी बनवलेल्या चिकन आणि दुधात तिने त्या गोळ्या मिसळल्या. कुटुंबातील सर्वांनी ते खाल्ल्यानंतर काही वेळातच सर्वजण बेशुद्ध पडले. घर शांत झाल्यावर आनाने 4 वर्षांच्या भाचीला उचलून छतावरील पाण्याच्या टाकीत टाकले, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला.
यानंतर तिने झोपलेल्या वहिनी फिरदौस यांच्या पोटावर धारदार चाकूने वार केले. त्या गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर स्वतःवर संशय येऊ नये म्हणून आनाने घरात दरोडेखोर घुसल्याची बनावट कथा सांगत आरडाओरडा केली. परिसरातील लोक जमा झाले आणि पोलिसांना माहिती देण्यात आली.
3 तासांत पोलिसांनी उलटला नंदेचा कट
घटनेची माहिती मिळताच SSP संजय वर्मा पथकासह घटनास्थळी पोहोचले. तपासादरम्यान आनाच्या बोलण्यात विसंगती आढळली ती जरा अडखळत होती चुक . चौकशीदरम्यान तिने गुन्ह्याची कबुली दिली. तिच्या सांगण्यावरून पोलिसांनी पाण्याच्या टाकीतून मुलीचा मृतदेह बाहेर काढला आणि फिरदौस यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
पोलिसांनी अवघ्या 3 तासांत प्रकरणाचा उलगडा करत आना हिला अटक केली. घटनास्थळावरून वापरलेला चाकू आणि नशेच्या गोळ्याही जप्त करण्यात आल्या. या घटनेनंतर संपूर्ण बसी कलां गावात भीती आणि चर्चेचे वातावरण पसरले असून नात्यांमधील कटुता किती टोकाला जाऊ शकते याचीच चर्चा सुरू आहे.
