पुण्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना; अंगणात खेळणाऱ्या 8 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, संध्याकाळी ताप आल्यानंतर…

घरासमोर खेळत असलेल्या एका आठ वर्षीय चिमुरडीवर गावातीलच एका अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या कान्हूर मेसाई या गावात उघडकीस आली. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी संशयित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं असून, त्याच्यावर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोक्सो) आणि भारतीय दंड संहितेनुसार बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित बालिका घरासमोर खेळत होती. ती घरात एकटी असल्याचे पाहून संशयित आरोपी तिथे आला आणि त्याने या चिमुकलीवर अत्याचार केला. घडलेल्या प्रकाराबाबत कोणालाही न सांगण्याची धमकी देऊन तो तेथून पसार झाला. मात्र, सायंकाळी बालिकेला ताप येऊन प्रकृती बिघडल्याने पालकांनी तिला उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल केलं. यावेळी तिच्यावर बलात्कार झाल्याचे तपासणीकरताना डॉक्टरांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी ही बाब पालकांना सांगितली.

धक्का बसलेल्या पालकांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. पालकांनी तातडीने शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेश डोंगरे आणि प्रतीक जगताप करीत आहेत. या प्रकारामुळे कान्हूर मेसाई गावात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.

ओळखीच्या व्यक्तींकडून चिमुकल्यावर होणार्‍या अत्याचारांमध्ये मागील काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे लहान मुलांबाबत पालकांनी अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता अधोरेखित होत आहे.

पुण्यात धक्कादायक घटना

पुणे शहरातही नुकतीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून कात्रज येथील मांगडेवाडी परिसरातील दगडांच्या खाणीत महिलेचा मृतदेह आढळला. सदर महिलेचा खून झाल्याचे उघड झाले असून, या प्रकरणात पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. दारूच्या नशेत झालेल्या वादानंतर महिलेला मारहाण करून खाणीत ढकलून दिल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *