आई, माझ्या मृत्यूनंतर पुस्तकं गरीब मुलांना दे; स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल, महाराष्ट्र हळहळला

महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या फार मोठी आहे, मात्र प्रत्येक विद्यार्थ्याला यश मिळेलच असे नाही. काही जण यातून चांगला मार्ग काढत आयुष्याला वेगळी दिशा देतात, काही जण मात्र परिस्थितीसमोर गुडघे टेकतात. गेल्या चार वर्षापासून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारा लातूर जिल्ह्यातील एका सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्याने अशाच प्रकारे टोकाचं पाऊल उचललं आहे. माझ्या मृत्यूनंतर माझी पुस्तकं गरजू विद्यार्थ्यांना द्या, त्यांना अभ्यासासाठी उपयुक्त ठरतील, असंही त्याने चिठ्ठीत लिहिलं आहे

काय घडलं नेमकं?

आई, मला या सर्व गोष्टींचा कंटाळा आला आहे, त्यामुळे मी आता आत्महत्या करत आहे, असे म्हणत तरुणाने राहत्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अमित उत्तम सोनकांबळे (वय २७, रा. शेळगाव, ता. चाकूर, जि. लातूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

आई-पप्पा, तुम्हाला सोडून जाऊ वाटत नाही. परंतु गेल्या चार वर्षांपासून तुमच्यापासून वेगळे राहण्याचा वैताग आला आहे, असा मजकूर लिहीत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अमितने स्वतःच्या खोलीतच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि.१६) सकाळी दहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

अमित मागील चार वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी लातूरमधील रस्त्यावरील संभाजीनगरमध्ये भाड्याच्या खोली घेऊन राहत होता. खाडगाव आई-वडिलांपासून सलग चार वर्षे अलिप्त राहिल्याने त्याला नैराश्य आले होते. या नैराश्यातूनच त्याने आई-वडिलांच्या नावाने एक चिठ्ठी लिहिली.

शेवटच्या चिठ्ठीत काय लिहिलं?

त्यात आई-पप्पा, तुम्हाला सोडून जावे वाटत नाही. परंतु, अलिप्त राहण्याचा वैताग आला आहे. माझी पुस्तके गरीब विद्यार्थ्यांना द्या, त्यांना अभ्यासाला उपयोगी पडतील, अशी भावनिक चिठ्ठी लिहून अमित सोनकांबळे याने त्याचे जीवन संपविले. या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *