विज्ञान शाखेचा पहिला पेपर देण्यासाठी जात असलेल्या बारावीच्या विद्यार्थ्याचा मंगळवारी प्रचंड गर्दीमुळे लोकलमधून पडून मृत्यू झाला. कळवा–मुंब्रादरम्यानच्या धोकादायक वळणावर सकाळी १०.१५ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. रेल्वे प्रवासी संघटनांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.
दीड वर्षांपूर्वी डोंबिवलीत शिफ्ट
सोहम कटरे (१८) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. डोंबिवली पूर्वेकडील आजदे परिसरात ‘सीता कुंज-१’ या इमारतीत तो आई-वडील आणि भावासोबत राहत होता. हे कुटुंब दीड वर्षापूर्वी कळवा येथून डोंबिवलीत स्थलांतरित झाले होते. सोहम कळवा येथील परीक्षा केंद्रावर जात असताना काळाने त्याच्यावर झडप घातली.
विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र डब्याची मागणी
सोहमच्या मृत्यूनंतर ‘रेल्वे अजून किती बळी घेणार’, असा संतप्त प्रश्न रेल्वे प्रवासी संघटनांनी उपस्थित केला. या घटनेविरोधात आज, बुधवारी ठाणे रेल्वे स्थानक परिसरात काळ्या फिती लावून रेल्वेच्या निष्काळजीचा निषेध करण्यात येणार आहे. यात प्रवाशांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन या संघटनांनी केले आहे. तसेच, गर्दीच्या प्रवासाची सवय नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र डब्याची व्यवस्था करण्याची मागणीही या निमित्ताने करण्यात येत आहे.
