लग्नसमारंभातून घरी परतताना नियतीचा घात; गतिरोधकावरुन दुचाकी घसरुन एकाचा मृत्यू, साताऱ्यातील घटना

अशास्त्रीय गतिरोधकावर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दीपक पांगारे (वय ५८, रा. शिवगोरक्ष अपार्टमेंट, बालाजीनगर) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

सातारा रस्त्यावर दुगड चौकापासून काही अंतरावर राव हॉस्पिटलच्या दारात शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला होता. या प्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांगारे हे बालाजीनगर परिसरात राहायला होते. ते एका खासगी आस्थापनेत नोकरी करीत होते. शनिवारी ते एका लग्नासाठी बाणेर परिसरात गेले होते. तिकडून मध्यरात्री परतत होते. त्या वेळी दीडच्या सुमारास त्यांच्या दुचाकीला अपघात झाला.

हॉस्पिटलच्या दारातील गतिरोधकावर त्यांची दुचाकी आदळली. त्यानंतर त्यांचा वाहनावरील तोल सुटला आणि रस्त्यावर पडून दुचाकीसोबत ते काही अंतर फरफटत गेले. यात त्यांच्या डोक्याला मागील बाजूस गंभीर दुखापत झाली. त्यामुळे रक्तस्राव मोठ्या प्रमाणावर झाला. एका खासगी आस्थापनेच्या सुरक्षारक्षकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांना पाचारण केले. त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे सोमवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *