खंडाळा तालुक्यातील सुखेड गावच्या हद्दीतील विहिरीत अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. सातारा स्थानिक गुन्हे शाखा आणि लोणंद पोलिसांनी ७२ तासात या प्रकरणाचे गूढ उकलत चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. मैत्रिणीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून तरूणाची हत्या केल्याची कबुली संशयितांनी दिली आहे.
खंडाळा तालुक्यातील सुखेड गावातील एका विहिरीत २५ ते ३० वर्षे वयाच्या अनोळखी तरूणाचा अर्धवट जळालेला मृतदेह हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आला होता. पोलिसांच्या प्राथमिक तपासात मृताचे सोमनाथ कल्याण बोबडे (रा. सेक्टर २०, कळंबोली, ता. पनवेल, जि. रायगड) असल्याचे निष्पन्न झाले. घातपाताची घटना असल्याने लोणंद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. फलटणचे डीवायएसपी विशाल खांबे, सातारा एलसीबीचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, लोणंदचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांच्या पथकाने सलग तपास करत हा गुन्हा उघडकीस आणला.
सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे एका संशयित कारचा शोध लावला. सलग तीन दिवसांच्या अहोरात्र तपासा संशयितांनी तरूणाची कळंबोली येथे नियोजनपूर्वक कट रचून हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी बंडू बापू भिसे (रा. कळंबोली, ता. पनवेल, मूळ रा. दुधेबावी, ता. फलटण), विजय पोपटराव पवार (रा. साखरवाडी, ता. फलटण), किरण विकास गायकवाड (मूळ रा. होळ, ता. फलटण, हल्ली रा. पारी चौक, पुणे) आणि श्रीनिवास ज्ञानेश्वर लोणे (रा. चुरमापुरी, ता. अंबड, जि. जालना, हल्ली रा. रायकर मळा, धायरी, पुणे) या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.
संशयित आरोपींनी सोमनाथ बोबडे याला कळंबोली येथे जबरदस्तीने होंडा सिटी कारमध्ये (MH -12 DY 8846) बसवून दोरीने हातपाय बांधले. गाडीतच त्याचा गळा आवळून खून केल्यानंतर मृतदेह सुखेड येथे आणून पेट्रोल टाकून पेटवला. अर्धवट जळालेला तो मृतदेह विहिरीत टाकला. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी विहिरीत मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर ७२ तासात हत्येचा छडा लावून चौघांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं.
