दिवंगत नेते अजित पवार यांनी मला नाशिक महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गटनेता करण्याचा शब्द दिला होता, मात्र त्यांच्या निधनानंतर घाणेरडं राजकारण करण्यात आलं. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सही शिक्क्यांचा गैरवापर करुन कोणीतरी बनावट पत्र बनवलं” असा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्या हेमलता पाटील यांनी केली आहे. अजित दादांनी मला शब्द दिला असताना सीमा ठाकरे गटनेत्या कशा झाल्या, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
हेमलता पाटील काय म्हणाल्या?
“राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मला स्पष्ट म्हणाले की गटनेतेपदाबाबतचं पत्र मी दिलं नाही, ही स्कॅन कॉपी आहे, कुणाच्या तरी ऑफिसमधून हे पत्र गेलं असेल, दोन तारखेला जेव्हा मी मुंबई कार्यालयात गेले, तेव्हा प्रदेशाध्यक्ष म्हणाले की थोड्याच वेळात मी तुला गटनेते पदाचं पत्र देतो. जेव्हा प्रदेशाध्यक्ष म्हणतात, की मी पत्र दिलेलं नाही, मात्र शहराध्यक्षांकडे असं पत्र आहे, याअर्थी त्यांच्या पत्राची बनावट कॉपी कोणी छापली का, त्यांच्या जुन्या पत्रावर नाव छापून कोणी टाकलं का?” असे सवाल उपस्थित होत असल्याचं हेमलता पाटील म्हणाल्या.
“२४ तारखेला सकाळी ८ वाजता मी अजित दादांना भेटले, त्यांना सगळं तौलानिक संख्याबळ सांगितलं. त्यावेळी दादांनी मला स्पष्ट सांगितलं की तुला गटनेतेपद देतो. १० वाजता तटकरे आल्यावर पुन्हा आम्ही चर्चा केली. त्यांच्यासमोरही दादांनी गटनेतेपदाबाबत सांगितलं” असा दावा हेमलता पाटील यांनी केला.
“२७ तारखेला जी व्यक्ती मला म्हणते, की तुला गटनेता करणार, त्यांच्या निधनानंतर त्यांचं नाव पुढे करुन कोणी असं घाणेरडं राजकारण करत असेल, तर अजितदादांची कार्यकर्ती म्हणून माझा विरोध आहे” असंही हेमलता पाटील म्हणाल्या.
दादांच्या नावाने खोटे राजकारण
“राजकारण हे माझ्यासाठी कधीही जगण्या-मरण्याचे साधन नव्हते. अजित दादांच्या शब्दाला जागत मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, पण त्यांच्या पश्चात त्यांच्याच नावाने खोटे राजकारण केले जात असेल, तर ते मी सहन करणार नाही,” अशी रोखठोक भूमिका माजी नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी मांडली आहे. काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर दादांच्या आग्रहाखातर आणि त्यांनी दिलेल्या शब्दामुळे डॉ. हेमलता पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. दादांनी त्यांच्या सहा टर्मच्या अनुभवाचा सन्मान करत त्यांना गटनेते पदाची ग्वाही दिली होती. मात्र, दादांच्या दुर्दैवी निधनानंतर नाशिकमध्ये गटनेते निवडीवरून संशयास्पद हालचाली सुरू झाल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.
जोपर्यंत प्रदेशाध्यक्ष या प्रकरणावर स्पष्टीकरण देत नाहीत, तोपर्यंत कोणत्याही गटात सहभागी न होता स्वतंत्रपणे काम करण्याचा निर्णय डॉ. पाटील यांनी घेतला आहे. “कोणत्याही दबावाला बळी न पडता लोकांसाठी काम करणे हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल,” असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
